‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’; मुनगंटीवारांची खडसेंना साद

sudhir mungantiwar and eknath khadse

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही बाब धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांनी निर्णय बदलावा अशी विनंती केली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. बुधवारी खडसेंनी राजीनामा देत राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग मोकळा केला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देणं ही बातमी धक्कादायक असून भाजपसाठी चिंतनाची बाब असल्याचं परखड मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा बुधवारी राजीनामा दिला. येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये खडसे प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली. खडसे हे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असून भाजप सोडणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. मात्र, खडसे पक्ष सोडणार नाहीत असा भाजपच्या नेत्यांना विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्या पक्षांतरामुळे अनेक नेत्यांना धक्का बसला आहे. मुनगंटीवार यांनी उघडपणे मान्य केलं आहे. खडसे यांनी ४० वर्षे पक्षाची मनापासून सेवा केली. असा नेता सच्चा राष्ट्रवादी पक्षाकडून बुरखा घातलेल्या राष्ट्रवादी पक्षात जात असताना मी नि:शब्द आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.