Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ... आणि शरद पवारांनी मशीद बांधावी - सुधीर मुनगंटीवार

… आणि शरद पवारांनी मशीद बांधावी – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

दोन-तीन नगरसेवक गेल्याने तारे तोडण्याचे कारण नाही, असा टोला मुनगंटीवार यांनी छगन भुजबळ यांना लगावला. शरद पवारांनी राजकीय खुर्चीसाठी अनेक पक्ष फोडले, असा घणाघाती आरोप देखील मुनगंटीवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी लखनऊ येथे राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवू शकता, मग मशिदीसाठी ट्रस्ट का नाही?, असा सवाल केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी “तुम्हाला जर मशिदीसाठी ट्रस्ट पाहिजे असेल तर तुमच्या पक्षाने ट्रस्ट स्थापन करून मशीद बांधा”, असा सल्ला दिला आहे. शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय खुर्चीसाठी पक्ष फोडले, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर केला आहे. शरद पवारांनी खुर्चीसाठी स्वतःच्या विचारांशी तडजोड केली. यासह यांच्या पक्षातील नेते काही पक्षांसोबत ३६-३६ तास सोबत राहिले, असे देखील मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांनी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील तोंडसुख घेतले आहे. छगन भुजबळ यांनी भाजपचे नाराज नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. याला उत्तर देताना मुनगंटीवार “दोन-तीन नगरसेवक गेल्याने तारे तोडण्याचे कारण नाही. दोन-तीन मंडळी भाजपमधून गेल्याने तुमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे,” असे म्हणाले. राज्यात सेवा देण्याचे काम सुरू ठेवा, अशी आठवण देखील मुनगंटीवार यांनी करून दिली.

कर नाही तर डर कशाला, खुशाल चौकशी करा – मुनगंटीवार

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या सुमारे ४९ कोटी वृक्षलागवड मोहिमेत घोटाळा झाल्याचे आरोप महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केले आहेत. दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना मुनगंटीवार यांनी खुशाल चौकशी करा, आम्ही इतर नेत्यांसारखे ईडी चौकशी केल्यावर नाचणारे नाही, असे म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -