अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावं बघून केली जातेय; आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका

राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात मुंबई महापालिकेच्या पथकाला अनधिकृत बांधकाम आढळले आहे. त्यावरून मुंबई महापालिकेतर्फे राणा दाम्पत्याला आजच कारवाईची नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे

ASHISH SHELAR
ASHISH SHELAR

राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात मुंबई महापालिकेच्या पथकाला अनधिकृत बांधकाम आढळले आहे. त्यावरून मुंबई महापालिकेतर्फे राणा दाम्पत्याला आजच कारवाईची नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेला कारवाईसाठी केवळ राणा, राणे, राणावत, कंबोजच दिसतात का? पालिकेला खान, पठाण, शेख यांच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसत नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत असा आरोपही यावेळी आशिष शेलार यांनी केला. सरकारने असा भेद करु नये असंही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रीय तपास संस्था एएनआयने काल मुंबईत धाडी टाकून दाऊदच्या हस्तकांवर कारवाई केली. मात्र, राज्यातील पोलिस हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर कारवाई करत आहे. हाच दोन्ही सरकारमधील फरक आहे. राष्ट्रवादी, हिंदुवादी आणि ढोंगी राज्य सरकारमधील हा फरक असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. आमचा कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही. मात्र, दिल्लीतील शाहीनबाग, जहांगिरपुरीतील अतिक्रमणांवर ज्याप्रमाणे कारवाई होती, तशीच कारवाई मुंबईतील नागपाडा, बेहरामपाडा, मोहम्मद अली रोड येथे का होत नाही? गेल्या 25 वर्षांपासून मी राजकारणात आहे. एकदाही या भागात अतिक्रमणविरोधी कारवाई झालेली नाही. या अतिक्रमणांकडे सरकार का दुर्लक्ष करते, असा सवालही आशिष शेलार यांनी केला.

सरकारी मालकीचा भूखंड बिल्‍डरच्‍या घशात घालून सुमारे एक नव्हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा

‘वांद्रे पश्‍च‍िम बॅन्‍डस्टँड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्‍डरच्‍या घशात घालून सुमारे एक नव्हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा करण्‍यात आला’, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर आरोप केला आहे. या पंचतारांकित जागेवर ‘एसआरए’ योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्‍डरला देण्‍यात येणार असल्‍याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार हे ‘ठग्ज् ॲाफ महाराष्ट्र’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मंत्रालयातील 6 व्या माळ्यावर बसणाऱ्या कुठल्यातरी मंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे शक्य नाही. एवढ्या फाईल स्पीडने धावत असतील तर मग रूस्तमजीचा खरा ‘आका’ कोण?, असा सवालही शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. यावेळी त्यांनी “5 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन वांद्रे बँडस्टँड भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात 1 हजार कोटींचा घोटाळा असल्‍याचा आरोप केला होता. त्‍याबाबत खुलासा उपनगर जिल्‍हाधिकाऱ्यांनी करुन यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारे घोटाळा झाला नसल्‍याचे प्रसिध्‍दीपत्रक जारी केले होते. त्‍या खुलाशाला आज उत्‍तर देणार नाही, योग्‍य वेळी आपण त्‍यावर बोलू. या भूखंडावर 168 कायम स्‍वरुपी संक्रमण शिबिरातील घरे बिल्‍डर बांधून देणार असे दाखवून सदर मोकळया भूखंडावर एसआरए योजना राबविण्‍याची परवानगी सरकारकडून देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे संक्रमण शिबिराच्‍या नावाखाली विकासकाला एसआरए योजनेचे फायदा देण्‍यात येणार आहेत”, असा दावा शेलार यांनी केला.

विकासकाला 1 लाख 90 हजार चौरस फुट एवढे क्षेत्रफळ विक्रीसाठी मिळणार

भूखंड मोकळा भूखंड म्‍हणून विकसीत केला तर विकासकाला 1 लाख 90 हजार चौरस फुट एवढे क्षेत्रफळ विक्रीसाठी मिळणार होते. मात्र या जागेवर एसआरए दाखवून 33 (11) अंतर्गत विकास केल्‍यास विकासकाला 3 लाख चौरस फूट एवढे प्रचंड क्षेत्रफळ विक्रीस मिळणार आहे. हा भूखंड रिकामा भूखंड म्‍हणून विकसित केला तर 2 एफएसआय मिळाला असता. पण एसआरए योजनेत दाखविल्‍यामुळे आता 4 एफएसआय बिल्‍डरला मिळणार आहे. सरकारकडून अशा प्रकारे 4 एफएसआयची खैरात तसेच मालकी हक्‍काने भूखंड बिल्‍डरला दिल्‍यामुळे 42 मजली टोलेजंग टॉवर या जागेवर उभा राहणार आहे. यामुळे विकासकाला सुमारे 3 हजार कोटींचा फायदा होणार आहे. या बदल्‍यात सरकारला 28 कोटी भरुन हा भूखंड केवळ 234 कोटीला मालकी हक्‍काने बिल्‍डरला मिळणार आहे. म्‍हणजे कवडीमोल किमतीत हा भूखंड विकासकाच्‍या घशात घालण्‍यात येतो आहे. हेच “का ते तुमचे करुन दाखवले”, असा टोलाही त्यांनी लगावला.

या संपूर्ण प्रकरणात धर्मदाय आयुक्‍त, एसआरए, उपनगर जिल्‍हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका यांचा सहभाग असून या सर्व प्रशासकीय कार्यालयातून ज्‍या वेगाने परवानग्‍या देण्‍यात येत आहेत. ते पाहता मंत्रालयातील कोणी उच्‍च पदस्‍थच ही सूत्रे हलवित आहे हे अधोरेखित होते. त्‍यामुळे तातडीने या प्रकरणाची चौकशी व्‍हावी. एसआरएकडून या भूखंडावरील योजनेला परवानगी देण्‍यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.


हेही वाचा – निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह : शरद पवार