घरमहाराष्ट्र'राज्यपालांचं सोडा, मंत्रीमंडळातील 'सखाराम बायंडर' प्रवृत्तींचं काय करायचं त्यावर चिंतन करा'

‘राज्यपालांचं सोडा, मंत्रीमंडळातील ‘सखाराम बायंडर’ प्रवृत्तींचं काय करायचं त्यावर चिंतन करा’

Subscribe

भाजप आमदार आशिष शेलार यांचा टोला

राज्यपालांचं काय करायचं याचं चिंतन करण्यापेक्षा मंत्रीमंडळातील सखाराम बायंडर प्रवृत्तीचं काय करायचं, याचं चिंतन करा, असा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमान उड्डाणाच्या वादावर शिवसेनेने ‘सामना’तून या राज्यपालांचे करायचं काय? हा भाजपचा प्रश्न असल्याचं म्हटलं. याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी हा टोला लगावला. सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. कारण या प्रकरणात भाजपने वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमान उड्डाणाचा वाद सुरु असताना आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन ठाकरे सरकार टीकेचं धनी होत आहे. दरम्यान, आज शिवसेनेने ‘सामना’तून या राज्यपालांचं करायचं काय? हा भाजपचा प्रश्न असं म्हटलं आहे. याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. “राज्यपालांचे करायचे काय?असा प्रश्न पडलाय? म्हणजे भारतरत्न महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय? असं विचारताय का? तीच तुमची खरी अडचण आहे का? ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरु आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही. घटनेनुसार विधिमंडळाचे कामकाज होत नाही. घटनेनुसार आमदारांना दिलेले हक्क तुम्हाला मान्य नाही. पंतप्रधान, राज्यपाल, न्यायाधीश अशा घटनात्मक पदांचा आदर करीत नाही. राज्यपालांचे करायचं काय? यापेक्षा जमलं तर मंत्रीमंडळातील “सखाराम बायंडर” प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा,” असं ट्लिट करत आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला.

- Advertisement -

- Advertisement -

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितली व एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले? असा हटवादीपणा करण्याचे कारण काय? मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हा विमान-वाद वेगळ्याच हवेत उडवू लागले आहेत. राज्यपालांना विमान नाकारले हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला फडणवीस यांनी मारला. १२ सदस्यांची विधान परिषदेत नियुक्ती करणे हा सरकारचा अधिकार आहे. या सदस्यांची नियुक्ती सहा वर्षांसाठी असते. त्यातले नऊ महिने राज्यपालांनी भाजपच्या इच्छेने गिळले. हे सदस्य त्यांच्या नियत वेळेनुसार निवृत्त होतील. पण त्यांच्या नियुक्तीची ‘वेळ’ राज्यपाल ठरवणार. हा घटनेचा भंग आहे. राज्यपालांनी हे असे वागणे कळसूत्री बाहुल्याप्रमाणे आहे. राजभवनात नियम, कायद्याची अशी पायमल्ली होणे ही काळी पृत्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयास भारतीय संविधान, नियम, कायदा वगैरेंची चाड असेल तर अशा राज्यपालांचे पूर्ण वस्त्रहरण होण्याआधी गृहमंत्रालयाने त्यांना परत बोलवायला हवे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्राला आघाडी सरकारवर नेम धरता येणार नाही. सरकार स्थिर व मजबूत आहे आणि राहील. राज्यपालांचे काय करायचे हा भाजपचा प्रश्न!

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -