घरताज्या घडामोडीकाळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत, मोदींना सल्ला देणार्‍या नवाब मलिकांवर भाजपची टीका

काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत, मोदींना सल्ला देणार्‍या नवाब मलिकांवर भाजपची टीका

Subscribe

नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रात्रीची संचारबंदी असून रात्रीच्या अंधारात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील मालकीच्या जमिनीवर रात्रीचा बोकड आणि शेळीचा बाजार भरत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भाजपने जिल्हाधिकऱ्यांना तक्रार दिली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरुन नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. रात्रीच्या काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत अशी टीकाच अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई असताना रात्रीच्या वेळी बाजार भरवण्यात येत आहे. कोरोनामुळे राज्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत परंतु मंत्र्यांच्या दीडशे एकर जमिनीवर बाजार भरतो यावरुन भाजपने टीका केली आहे. रात्रीच्या अंधारातल्या बाजारावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत.

- Advertisement -

रात्रीच्या अंधारात भरवला जात होता बाजार

उस्मानाबाद तालुक्यातील जवळा दुमला येथे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मालकिची जमिन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत. परंतु या नियमांना हरताळ फासून रात्रीच्या अंधारात गेल्या ३ ते ४ आठवड्यांपासून शेळी व बोकडचा बाजार भरवला जात होता. या बाजारात मोठ्या संख्येने विक्रेते आणि खरेदीदार येत होते. शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांची विक्री केली जात होती. रात्रीच्या अंधारात ५० पेक्षा अधिक वाहने ये-जा करत होती असा खुलासा ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. या बाजारातील काही वाहने ताब्यात घेत जमाव पांगवण्यात आला. परंतु हा बाजार भरवल्याबाबत अद्याप कोणावर तक्रार दाखल करण्यात आली नाही आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा दबदबा असल्यामुळेच कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आरोप केला असून नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -