केसरकरांच्या आरोपांनंतर नितेश राणे थेट उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबियांविषयी केलेल्या आरोपांनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नितेश राणेंनी केसरकरांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. पण केसरकरांच्या वक्तव्यानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र दिसत आहे.

दीपक केसरकरांचा आरोप काय?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचा प्रयत्न सुरु झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याने हे प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात संवाद सुरु झाला होता. ठाकरे यांनी पदापेक्षा मोदी यांच्याशी असलेले संबंध जपण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची तयारी ठेवली होती. मात्र, नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि संवाद थांबला, असा दावाही केसरकर यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे यांची तयारी होती. पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्याने ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले. आदित्य ठाकरेंची बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याचे ठरवले होते, असेही त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेनेत युतीची बोलणी सुरु असताना विधानसभेत भाजपच्या १२ आमदाराचे निलंबन झाले . यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले, असं केसरकर म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.


हेही वाचा : राज्यातील 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; डॉ. विजय सूर्यवंशी MMRDAचे अतिरिक्त आयुक्त