घरCORONA UPDATEठाकरे सरकार कोकणासाठी सर्वात मोठा शाप - नितेश राणे

ठाकरे सरकार कोकणासाठी सर्वात मोठा शाप – नितेश राणे

Subscribe

‘राज्यातल्या ठाकरे सरकारने कोकणासाठी काहीही केलं नसून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे हे सरकार म्हणजे कोकणासाठी सगळ्यात मोठा शाप आहे’, अशी परखड टीका भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. माय महानगरच्या ‘खुल्लम खुल्ला’ या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली. कोरोना संकटकाळात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी जो त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींसाठी ठाकरे सरकारच्या निर्णयांमध्ये असलेला गोंधळ आणि अकार्यक्षमता कारणीभूत असल्याचं ते म्हणाले.

‘चाकरमान्यांमध्ये सरकारने भांडणं लावली’

ठाकरे सरकारमुळे कोकणातली परिस्थिती कशी बिघडली आहे, याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘गेल्या ६ महिन्यांत कोरोना आल्यापासून गावागावांत सुरू झालेल्या भांडणासाठी हे ठाकरे सरकार जबाबदार आहे. निर्णय घेण्यात वेळकाढूपणा, नियमांबाबतचा संभ्रम, कोकणासाठी निधी नाही अशी परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. आधी कोकणातला चाकरमानी गावात यायचा, सुखरूप राहायचा, सत्यनारायण पूजा घालायचा, लोकं सोबत फिरायचे, भजनं व्हायची. पण या वेळी या लोकांनी इतकी भांडणं लावली आहेत चाकरमान्यांमध्ये की हे काहीही आता होत नाही. त्यामुळेच हे सरकार कोकणाला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. तेच आम्ही अनुभवतोय’, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘शिवसेना म्हणजे कोकण, कोकण म्हणजे शिवसेना’

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना ई-पास, स्थानिक प्रशासनाची परवानगी, क्वारंटाईन होण्याचा दीर्घ काळ असे नियम राज्य सरकारकडून घालण्यात आले आहेत. त्यातच स्थानिक प्रशासनाकडून देखील वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टीका करताना राणे म्हणाले, ‘अनिल परब माय महानगरच्या कार्यक्रमात म्हणाले होते, कोकणात जाण्यासाठी एसटी मोफत सोडणार. पण त्याचं काय झालं? तुम्ही बिहार, उत्तर प्रदेशातल्या सगळ्या परप्रांतीय कामगारांना परत पाठवलं. ते चांगलंच झालं. पण ज्या कोकणी जनतेमुळे तुम्ही निवडून आला आहात, त्यांच्यासाठी तुम्ही खरंतर सगळ्या सुखसोयी द्यायला हव्यात. तुमची प्राथमिकता कोकणातला माणूसच असायला हवी. कारण शिवसेना म्हणजे मुंबई आणि कोकण आणि कोकण म्हणजेच शिवसेना. मराठवाडा वगैरे सगळं नंतर जोडलं गेलं. बाळासाहेबांची शिवसेना आधी मुंबई आणि कोकणात वाढली. त्यांच्यासाठीच तुम्ही काही करू शकत नसाल, तर तुमच्या सरकारचा फायदा काय?’, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, यावेळी निसर्ग चक्रीवादळासाठीच्या मदतनिधीवरून देखील त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ‘निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी आम्हाला काय मिळालं? २५ कोटी सिंधुदुर्गसाठी जाहीर झाले. पण त्याचे किती पैसे आले? अजून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव देखील पाठवलेला नाही’, असं नितेश राणेंनी यावेळी नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -