मुंबई – बीड जिल्ह्यातील महायुती आणि भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरु आहे हे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचा विषय लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर आता त्यांचा मोर्चा पंकजा मुंडे यांच्याकडे वळालेला दिसत आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या विचाराचा माणूस विजयी झालेला नाही, असा आरोप करत सुरेश धस म्हणाले की, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची तक्रार पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना करणार करणार आहे.
आष्टीमध्ये पंकजा मुंडेंच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही…
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आमदार सुरेश धस आग्रही होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता धसांच्या रडारवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आल्या आहेत का, असा सवाल उपस्थित होते आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलाताना आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या विचारांचा आमदार आष्टीमध्ये निवडून आला नसल्याचे म्हटले आहे.
सुरेश धस आणि पंकजा मुंडे दोघेही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, मात्र धसांचा आरोप आहे की, पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघात सुरेश धसांऐवजी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचार केला. या प्रकरणी आतापर्यंत मी पक्षातील नेत्यांशी बोललो नाही, पण आता पंकजा मुंडे यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सुरेश धस म्हणाले.
त्यांनी कमळाचा नाही शिट्टीचा प्रचार केला…
भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतरही पंकजा मुंडे या मस्साजोगमध्ये गेल्या नाही. त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत त्यांनी कधीही याप्रकरणावर बोलण्याचे धाडस दाखवले नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या म्हणाल्या की त्यांना मंत्रिमंडळातच घ्यायला नको होते.
आष्टी मतदारसंघात त्यांच्या विचारांचा माणूस निवडून आलेला नाही. मी भाजपचा उमेदवार म्हणून निवडून आलो असेही सुरेश धस म्हणाले.
पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या आहेत, तर त्या बीडमध्ये माझा एकच उमेदवार आहे असं कसं काय म्हणाल्या. बीडमध्ये तर भाजपचे दोन उमेदवार होते, आष्टीमधून मी आणि केजमधून नमिता मुंदडा. मग राष्ट्रीय नेत्यांचा बीडमध्ये एकच उमेदवार कसा काय? असा सवाल त्यांनी पंकजा मुंडेंना केला. आष्टी मतदारसंघात त्यांचे (पंकजा मुंडे) चिन्ह शिट्टी होते. भीमराव धोंडे यांचा प्रचार त्यांनी केला. पक्षविरोधी कारवाई केल्या प्रकरणी आता मी त्यांची लेखी तक्रार केंद्रीय नेत्यांकडे करणार असल्याचे आमदार धस म्हणाले.
सुरेश धस का भडकले…
मंत्री पंकजा मुंडे यांनी एका मराठी दैनिकाला आज मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आमदार सुरेश धस यांची वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धसांना समज द्यावी, अशी विनंती केली असल्याचे त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हापासून सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा विषय माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर आणि रस्त्यावर उतरून आक्रमकपणे मांडत आहेत. सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. पक्षातील नेत्यांबद्दल त्यांना तक्रार असेल तर त्यांनी पक्षातील वरिष्ठांकडे त्यासंबंधी बोलले पाहिजे. मात्र ते पक्ष शिस्तीच्या विरोधात वागत असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धसांना समज द्यावी असे पंकजा मुंडेंनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. त्यावर सुरेश धसांनी, आता पर्यंत मी पक्षाच्या वरिष्ठांकडे त्यांची तक्रार केली नाही, मात्र आता पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : Vidhan Parishad Election : भाजपकडून 3 नावे पक्की; माधव भंडारींना निष्ठेचे फळ मिळण्याची शक्यता