Homeमहाराष्ट्रSuresh Dhas : संतोष देशमुख हत्येतील आरोपीसंबंधी सुरेश धसांची मोठी मागणी; तेरे...

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्येतील आरोपीसंबंधी सुरेश धसांची मोठी मागणी; तेरे नाम झाला पाहिजे…

Subscribe

मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला आज एक महिना झाला, मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गु्न्हा दाखल नाही. यामुळे राज्याभरातून रोष व्यक्त होत आहे. राज्यातील सरपंचांनी आझाद मैदानात परिषदेचे आयोजन करुन संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला. या परिषदेला भाजपचे आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुखची हत्या आपल्याला विसरायची नाही. त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका. त्यासोबतच आमदार धस यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, अशी मागणी आमदार धस यांनी केली.

संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर आष्टीचे आमदार सुरेश धस आक्रमक झाले आहेत. लातूर, पुणे येथे निघालेल्या आक्रोश मोर्चामध्येही ते सहभागी झाले. प्रत्येक मोर्चात आमदार धस यांनी बीडमधील माफिया राजचे वेगवेगळे चित्र राज्यासमोर मांडले आहे. आज सरपंच परिषदेत सहभागी होत आमदार धस यांनी राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

आका असो की आकाचा बाका…

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजे. आका असो की आकाचा बाका, टाका असो. कोणीही असले तरी ते सर्व बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजे. सुरेश धस यांनी डोक्यावरुन हात फिरवत म्हटले की, यांचा ‘तेरे नाम’ झाला पाहिजे. यांना कोणीही भेटलं नाही पाहिजे. यांचे नातेवाईकही यांना भेटले नाही पाहिजे. यांना कोणत्या बिनभाड्याच्या खोलीत टाकायचे याबद्दलही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. असंही आमदार सुरेश धस म्हणाले.

आमदार धस म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींचे लागेबांधे लांबपर्यंत आहेत. आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांनाही भेटता आलं नाही पाहिजे अशीही मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. सरपंच परिषदेत आमदार धस म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येला आपल्याला विसरता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत आपल्याला संतोष देशमुखांची हत्या लक्षात ठेवावी लागेल. वेळ लागला तरी आपल्याला लढत राहावे लागेल, असे आवाहन त्यांनी सरपंचांना केले.

हेही वाचा : Beed Murder : मुख्यमंत्री भेटीआधी धनंजय देशमुखांचा मोठा निर्णय; उच्च न्यायालयातील ती याचिका घेतली मागे