Homeताज्या घडामोडीSantosh Deshmukh Murder Case : आका आणि आकाच्या आकामध्ये द्वंद्व; आमदार सुरेश...

Santosh Deshmukh Murder Case : आका आणि आकाच्या आकामध्ये द्वंद्व; आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप

Subscribe

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याच्याविरोधात यंत्रणा कसून कामाला लागली आहे. सीआयडीने त्याची बँक खाती गोठवली आहेत. त्याच्या नातेवाईकांचीही आर्थिक नाकेबंदी करण्याची पोलीस आणि सीआयडीकडून तयारी सुरु आहे. वाल्मिक कराड याला पुण्यात अटक झाली, अशाही बातम्या आल्या. या सर्वांवर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. सरेंडर करायचे की नाही, यावरुन आका आणि आकाचे आका यांच्यात द्वंद्व सुरु असल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.

आमदार सुरेश धस यांनी आज बीडे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. दीर्घ रजेवर असेलेल जिल्हाधिकारी पाठक आज रुजू झाले. त्यांच्या भेटीनंतर आमदार धस यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडला पुण्यात अटक झाली की नाही, याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्याबद्दल सीआयडीच खात्रीलायक सांगू शकेल. त्यांनी सांगेपर्यंत आका आत गेला की नाही, हे सांगता येणार नाही. पण सध्या आका आणि आकाचे आका यांच्यात हजर व्हायचे की नाही, यावरुन द्वंद्व सुरु आहे. असं आमदर धस म्हणाले.

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, याचा पुनरुच्चार करत आमदार सुरेश धस म्हणाले की, बीड जिल्ह्यात 3 ते 5 अकाऊंटवरुन दर महिन्याला पैसे ट्रान्सफर होतात. हे पैसे कोणाला ट्रान्सफर होतात, याचा शोध घेतला पाहिजे.

पर्यावरण मंत्र्यांनी राख माफियाकडे वक्रदृष्टी टाकावी – सुरेश धस

परळीमधील वाढत्या गुन्हेगारीचा पोलिसांनाही धाक असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरेश धस म्हणाले की, परळीचे पोलीस आतापर्यंत गुन्हेही दाखल करुन घेत नव्हते. थर्मल पॉवरची राख गावात पसरत असल्यामुळे लहान मुलांना दम्याचा त्रास होत आहे. याचे ठेके कोणाकडे आहे. ते कशी वाहतूक करतात. उघड्यावरुन राख वाहून नेली जाते. याविरोधात कोणीही बोलायला तयार नाही. बीड शहरालगत 600 वीट भट्ट्या आहेत. यातील 300 हून अधिक वीट भट्टी या अवैध आणि बेकायदा जमीनीवर आहेत. पंकजा मुंडे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, आता कळतंय की पर्यावरण खातं आमच्या जिल्ह्याकडे आहे. पर्यावरण खात्याने राख माफियांकडे वक्रदृष्टी नाही, पण सरळ दृष्टीतरी टाकावी. असा टोला सुरेश धस यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला.

आकाचं साम्राज्य किलोमीटरने वाढले…

वाल्मिक कराडचा नामोल्लेख टाळून सुरेश धस म्हणाले की, चंद्र कले कलेने वाढतो. मात्र आकाचं क्षेत्र हे किलोमीटरने वाढत होते. त्यामुळे ते लोकांच्या डोळ्यात आले. त्यांनी आष्टीमध्येही घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आकाला आणि आकाच्या आकालाही सांगितलं होतं. हे लहान लहान पोरांना चिथावून देतात. जा तू, मी आहे ना! असं त्यांना सांगतात. यामुळेच गुन्हेगारी वाढत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचं वय काय आहे? 21 ते 25 वर्षांची पोरं आहेत. माझ्या मतदारसंघात हातभट्टी, गुंडांचे वाढदिवस मी बंद केले आहेत, असा दावाही सुरेश धस यांनी केला.

हेही वाचा : Suresh Dhas : मुख्यमंत्र्यांसमोर झोळी पसरतो, भीक मागतो, माझी आर्तकिंकाळी आहे…; सुरेश धस असं का म्हणाले….

Edited by – Unmesh Khandale