घरमहाराष्ट्रभाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट आजारी होते. मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

बापट यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय वर्तुळातून त्यांच्याप्रति शोकभावना व्यक्त करण्यात आल्या. बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरीश बापट हे नम्र आणि कष्टाळू नेते होते. त्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापट यांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

कसबा पेठेतील किंगमेकर अशी गिरीश बापट यांची ओळख होती. दीर्घकाळापासून आजारी असतानाही त्यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत सहभाग घेतला होता. नाकात नळी, बोटाला ऑक्सिमीटर लावून भाषण करीत त्यांनी कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवला होता. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यावरून विरोधकांनी भाजपला धारेवर धरले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौर्‍यावर आले असताना त्यांनी गिरीश बापटांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

=१९८३ पासून सलग ३ वेळा पुणे महापालिकेत नगरसेवक
=१९९५ पासून सलग ५ वेळा विधानसभेत
=२०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
=२०१९ मध्ये काँग्रेसच्या मोहन जोशी यांना पराभूत करीत लोकसभेत

- Advertisement -

सर्वसमावेशक नेतृत्व गमावले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भाजपचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट त्यांच्या रूपाने पक्षनिष्ठ पण पक्षापलीकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -