Homeमहाराष्ट्रVinod Tawde on Pawar : सावरकरांबद्दलही पवार हेच म्हणाले असते का, भाजप...

Vinod Tawde on Pawar : सावरकरांबद्दलही पवार हेच म्हणाले असते का, भाजप नेते विनोद तावडे यांचा सवाल

Subscribe

अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती असे सांगतानाच दोन जन्मठेपांची - काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का, असा सवाल देखील तावडे यांनी पवारांना केला आहे.

मुंबई : शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादी – शरद पवार आणि भाजपामधील आरोप – प्रत्यारोपांचे सत्र अजूनही सुरूच आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती असे सांगतानाच दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का, असा सवाल देखील तावडे यांनी पवारांना केला आहे. (bjp national general secretary vinod tawde asked whether ncp sp leader sharad pawar would have said the same about sawarkar marathi news)

नुकत्याच झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली होती. 1978 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होता. शरद पवारांनी धोक्याचं राजकारण केले. तर अंतिम धोका देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. त्या दोघांना जनतेनं घरी बसवलं, असं शहा म्हणाले होते. शहा यांच्या या टीकेनंतर शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांच्या या टीकेला उत्तर दिले.

हेही वाचा – Indian Army Day : छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला सामर्थ्य दिले – पंतप्रधान मोदी

शहा यांच्या टीकेची दखलही घेत नसल्याचे सांगतानाच शरद पवार यांनी अमित शहा यांचा उल्लेख तडीपार झालेले गृहमंत्री असा केला. तसेच या पदाचा मान सांभाळण्याचे आवाहनही केले. यासाठी यापूर्वीच्या काही गृहमंत्र्यांचे उदाहरण देखील त्यांनी दिले. शरद पवारांच्या या टीकेनंतर भाजपाकडून त्यांना तातडीने उत्तर दिले. मंगळवारी संध्याकाळी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला बोलायला लावू नका, असा इशारा दिला होता. तर आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एक पोस्ट करत शरद पवारांना काही प्रश्न विचारले आहेत.

विनोद तावडे म्हणतात, दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक आणि इस्लामी दहशतवाद्याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा पवार साहेब विसरले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Aaditya Thackeray : नेत्यांच्या दौऱ्यांसाठी मुंबईकरांना का वेठीला धरता, वाहतुकीतील बदलामुळे ठाकरे भडकले

दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्याचबरोबर अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री, पंतप्रधान तसेच गृहमंत्री देखील झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का, हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे, असेही तावडे यांनी म्हटले आहे. अमित शहा म्हणाले ते पवारांना झोंबले असावे म्हणून त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली असावी. पण शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने अभ्यास न करता अशी टीका करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.