पंकजा मुंडेंचा पत्ता कट ; प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपत असताना भाजपने बुधवारी दिल्लीतून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची घोषणा केली. भाजपच्या उमेदवार यादीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची छाप आहे.

vidhan bhavan

विधान परिषदेच्या उमेदवारीची आस बाळगून असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले आहे. पक्षाने मुंडे यांच्याऐवजी माजी मंत्री आणि भाजपचा ओबीसी चेहरा असलेले राम शिंदे यांना संधी दिली आहे. शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करताना भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने मुंडे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत.

भाजपने प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांना फेरउमेदवारी नाकारून श्रीकांत भारतीय, उमा खापरे या नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. विधान परिषदेतील मावळते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर विश्वास व्यक्त करताना भाजपने पाचव्या जागेवर प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपत असताना भाजपने बुधवारी दिल्लीतून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची घोषणा केली. भाजपच्या उमेदवार यादीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची छाप आहे. फडणवीस यांनी आपल्या पसंतीचे उमेदवार देताना पंकजा मुंडे यांना शह दिला आहे.

विधान परिषदेची उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीची मागणी केली होती, मात्र त्यांच्या मागणीची पक्षाने दखल घेतली नाही. त्यांच्याऐवजी ओबीसी समाजातील राम शिंदे आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना संधी देण्यात आली. खापरे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केलेले आणि सध्या प्रदेश भाजपचे सरचिटणीस असलेले श्रीकांत भारतीय यांना भाजपने संधी दिली आहे. गेली अडीच वर्षे विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारे प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूरप्रकरणी गुन्हा दाखल असतानाही भाजपने त्यांना संधी दिली आहे. फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे प्रसाद लाड यांना भाजपने पाचवा उमेदवार म्हणून घोषित केल्याने विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार आहे.

२४ वर्षांनंतर मेटे विधान परिषदेच्या बाहेर
भाजपने आपले सहयोगी सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही. मेटे हे १९९८पासून काही अपवाद वगळता सलग २४ वर्षे विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये पहिल्यांदा मेटे विधान परिषदेची पायरी चढले होते. त्यानंतर मेटे राष्ट्रवादी काँग्रेस आणि २०१६मध्ये भाजपमधून विधान परिषदेवर निवडून गेले. आता चार टर्म विधान परिषदेचे सदस्यपद भूषवल्यानंतर मेटे प्रथमच संसदीय राजकारणाच्या बाहेर असणार आहेत.