मुंबई : विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपने पुढील महिन्यात 12 जानेवारी रोजी शिर्डीत पक्षाचे प्रदेश अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. (BJP now focused on the local body elections in the state)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी शिर्डीतील या अधिवेशनाची माहिती दिली. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत या दिवशी शिर्डीत भाजपने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. विवेकानंद यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपकडे आकर्षित करण्यासाठी यावेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा – Ambedkar on EVM : शेवटच्या तासातील प्रत्येक बुथवरील मतदानाची आकडेवारी द्या; आंबेडकरांची नेमकी मागणी काय
शिर्डीत आयोजित अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे 10 हजार भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याने हे अधिवेशन भाजपच्या आगामी काळातील योजनांसाठी महत्त्वाचे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
स्थानिक निवडणुका याचवर्षी ?
इतर मागासवर्गाचे आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्या, प्रभाग रचना यासंदर्भातील अधिकार राज्य सरकारचे की निवडणूक आयोगाचे या आणि इतर मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. यासंदर्भात पुढील महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊन निवडणुका याचवर्षी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपने या निवडणुकांसाठी आतापासून तयारी चालवली आहे.
हेही वाचा – Hindu in Bangladesh : बांगलादेशातील हिंदूंसाठी सरकारचे प्रयत्न काय; काय म्हणाले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
Edited by : Ashwini A. Bhatavdekar