घरमहाराष्ट्रपुणेकसबा पेठ निवडणूक मानाची : मविआचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप, काँग्रेस उमेदवार...

कसबा पेठ निवडणूक मानाची : मविआचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचे उपोषण

Subscribe

भाजपकडून लोकशाहीची हत्या होत आहे. भाजपकडून मतदारसंघात पैसे वाटप सुरु असून पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. कसबा गणपतीसमोर ते सपत्नीक उपोषणाला बसले आहेत.

Kasba Bypoll Election : पुणे – कसबा पेठ निवडणूक मानाची झाली आहे. कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार २४ फेब्रुवारी रोजी संपला. भाजप आणि महाविकास आघाडीकडून दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. उद्या ( २६ फेब्रुवारी) या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचार थांबल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) पोलिसांच्या मदतीने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हा आरोप केला आहे.

भाजपने पोलिसांच्या मदतीने मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप कसबा पेठचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. तर संजय राऊत यांनीही या आरोपांना दुजोरा देणारे वक्तव्य केले आहे. भाजपकडून अनेक वेळा पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटल्या जात असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बारामती, पुणे येथे पोलिसांच्या वाहनातून पैसे वाटल्याचे पुरावे मिळाल्याचं त्यांनी म्हटले आहे. पोलिसच भाजपचे राजकीय एजंट बनून पैशांची व्यवस्था सांभाळत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

रवींद्र धंगेकरांचे सपत्नीक उपोषण
निवडणुकीत पैसे वाटले जात असल्याचा आरोप करणारे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती येथे सपत्निक उपोषण सुरू केले आहे.
धंगेकर म्हणाले, गेल्या चार दिवसांपासून कसबा पेठेत पैसे वाटप सुरु आहे. शुक्रवारी रात्री भाजपकडून पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. पैसे वाटपाचे पुरावे माझ्याकडे असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. त्याठिकाणी पोलिस बघ्याची भूमिका घेत असून काँग्रेस कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे. त्यासोबतच धंगेकर म्हणाले, शुक्रवारी जाहीर प्रचार संपल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पदयात्रा करत होते, असाही आरोप धंगेकर यांनी केला आहे.

पोलिसांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे 

- Advertisement -

रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला आहे. याविरोधात त्यांनी सुरु केलेले उपोषण काही तासांत मागे घेतले आहे. पोलिस प्रशासनाने धंगेकर यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी तपासाचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

चिंचवडमध्ये पैसे वाटताना भाजप कार्यकर्त्याला पकडले 

चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला. त्यानंतर मध्यरात्री रहाटणी शिवराज कॉलनी येथे तांबे शाळेजवळ भाजपच्या प्रभाग क्रमांक ३३ चे अध्यक्ष माधव मनोरे यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. या संबंधी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र निवडणूक आयोगाकडे याची अजून नोंद झालेली नाही.

भाजपने महाविकास आघाडीचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. धंगेकरांना पराभव दिसत असल्यामुळे ते असे आरोप करत असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे.

कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासणे यांच्यात लढत होत आहे. दोघेही माजी नगरसेवक असून ओबीसी समाजाचे आहेत. कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. गिरीश बापट येथून पाचवेळा निवडून आले होते. मागील विधानसभेत मुक्ता टिळक यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या होत्या. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा येथे पोटनिवडणूक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -