घर ठाणे मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनीचे लोकार्पण करूनही पाणीटंचाई जैसे थे, भाजपचे ताशेरे

मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनीचे लोकार्पण करूनही पाणीटंचाई जैसे थे, भाजपचे ताशेरे

Subscribe

ठाणे : दिव्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी जलवाहिनीचे उद्घाटन केले होते मात्र त्यानंतरही दिव्यातील पाणीटंचाईची समस्या कायम असून नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी रहिवासी करत आहेत. यावरूनच दिव्यातील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान करण्याची संधी सोडलेली नाही.

दिव्यातील सर्वसामान्य माणसाची पाणी टंचाई दूर करण्याचे आश्वासन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिव्यातील सभेला गर्दी जमविण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन जलवाहिनीचे लोकार्पण झाले तरीही अद्याप दिव्यातील जनतेला पाणी मिळाले नसून अनेक भागात भीषण पाणीटंचाई “जैसे थे” आहे, अशी प्रतिक्रिया आणि आरोप दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

दिव्यातील जनतेला गृहीत धरण्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू असून आता दिव्यातील जनतेने स्वतः पुढाकार घ्यायला हवा, अशी भावना ज्योती पाटील यांनी व्यक्त केली आहे. पाण्याच्या नावाने किती दिवस दिव्यातील जनतेची फसवणूक केली जाणार? आणि दिव्यातील जनता ही पाण्याच्या नावाखाली किती वेळा राजकारण्यांना बळी पडणार? असा सवाल ज्योती पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दिवा शहरात आजही भीषण पाणी टंचाई असून नवीन जलवाहिनीचे लोकार्पण झाले तरी पाणी प्रश्न मात्र अद्यापही सुटलेला नाही. नवीन जलवाहिनीचे लोकार्पण झाले की दिव्यातील प्राणी प्रश्न सुटेल असे अनेकांना सांगून सभेसाठी गर्दी जमवली. आता लोक आम्हाला प्रश्न विचारतात की, पाण्यासाठी गेलो मात्र पाणी काही आले नाही. यावर आता पालिका प्रशासन काय उत्तर देणार?असाही सवाल ज्योती पाटील यांनी केला आहे. पालिका प्रशासनाने अंतर्गत पाईपलाईन शहरात नियोजनपूर्वक टाकल्याशिवाय पाणी प्रश्न सुटणार नाही हे आम्ही वारंवार सांगत आहोत. शो बाजी करण्यापेक्षा महापालिकेने नागरिकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्यावे, असा टोला ज्योती पाटील यांनी लगावला आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Ajit Pawar : मला महाराष्ट्रातील राजकारणात रस, नाराज नाही ; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया


 

- Advertisment -