महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचं ‘मराठी दांडिया’ कार्ड; मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

मुंबई: राज्यात राजकीय भूकंप झाल्यावर शिवसेना शिंदे गटाशी संधान बांधून भाजपने सतेची खुर्ची पुन्हा एकदा मिळवली. या सत्तेचा उपयोग मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करून मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजप विविध फंडे आजमावत आहे. सत्ता मिळवताच भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून कोरोना निर्बंध हटवून दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला. आता मुंबईत भाजपतर्फे गुजराती सोबतच मराठी वोटबँकेसाठी ‘मराठी दांडिया महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे.

त्यासाठी भाजपने प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेचा यांना मुंबईत भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. फाल्गुनी फाटक प्रमाणेच आता अवधूत गुप्ते मुंबईत मराठी दांडियानिमित्ताने गरबा व मधूर आवाज घुमणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या काळाचौकी, अभ्युदय नगरात हा मराठी दांडिया रासलीला मुंबईकरांना मोफत प्रवेशाद्वारे बघायला मिळणार आहे. या मराठी दांडियात भाग घेण्यासाठी गरबा प्रेमींना भाजपच्या विविध कार्यालयातून ‘विशेष पास’ उपलब्ध करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील माहिती भाजपचे आमदार मिहीर कोटेचा व भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिली. यावेळी, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, भाजपचे मुंबई महापालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे हे उपस्थित होते.

निवडणुकीसाठी मराठी दांडिया नाही : आ. मिहीर कोटेचा

गेल्या अडीच वर्षात हिंदू सण दाबले गेले होते. आता भाजप सरकारने सर्व निर्बंध उठविल्याने मुंबईत हिंदूंचे सण हे जोरात साजरे होणार आहेत, असे उद्धव ठाकरे सरकारचे नाव न घेता आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.
तसेच, आम्ही निवडणुकीसाठी दांडिया ठेवला नाही. आम्ही तीन लोकेशन निवडले होते पण काळाचौकीत योग्य ठिकाण आवडलं म्हणून त्या ठिकाणी मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, नवरात्री उत्सवाला व या मराठी दांडिया कार्यक्रमाला शेवटच्या २ दिवसात सरकार रात्री १२ पर्यंत परवानगी देईल. तसेच, या कार्यक्रमाला १ ऑक्टोबर रोजी वैशाली सामंत व अन्य अनेक मराठी कलाकार, गायक उपस्थित राहतील, अशी माहिती आ. कोटेचा यांनी दिली. या मराठी दांडिया उत्सवात दररोज १४ ते १५ हजार लोक सहभागी होतील.

मोठा दांडिया उत्सव व्हायला पाहिजे : चित्रा वाघ, भाजप, महिला आघाडी

मुंबईत मोठा दांडिया उत्सव व्हावा असे आम्हाला वाटतं होते. उपनगरात दांडिया मोठ्या प्रमाणात खेळतात पण शहर भागातही असा दांडिया उत्सव व्हावा, असे वाटत होते. असेत्यामुळे प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्यासह आम्ही दांडियाचे आयोजन केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.

मराठी दांडिया उत्सवाचा आनंद : अवधूत गुप्ते, गायक

मुंबईत काळाचौकी येथे मराठी दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मी मराठी, हिंदी व गुजराती गाणी गाणार आहे. याचा मला खूप आनंद वाटत आहे. मला या कार्यक्रमातून जास्त व सलग गायला मिळणार आहे. भाजपने या दांडिया उत्सवाचे आयोजन करून मला गाण्याची संधी दिल्याबदल मी भाजपचे खूप आभारी आहे. तसेच,आम्हाला कोणता पक्ष नसतो आम्हाला जिथे सादरीकरण करायला संधी मिळते तिथे आम्ही कार्यक्रम करतो. या कार्यक्रमासाठी माझी व माझ्या कलाकारांची जोरात तयारी सुरू आहे.


हेही वाचा : मोठ्या संघर्षानंतर अखेर अंकिताच्या पार्थिवावर एनएआयटी घाटावर अंत्यसंस्कार