जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्याची गिरीश महाजन यांना शिवीगाळ

BJP leader Girish Mahajan
भाजप नेते गिरीश महाजन

भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना एका कार्यकर्त्याने शिवीगाळ केल्याची माहिती समोर आले आहे. तसेच या कार्यकर्त्याने भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीवर दगडफेक केल्याचीही धक्कादायक घटना जळगाव येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी रात्री संपन्न झाली. या बैठकीनंतर आमदार गिरीश महाजन आणि पदाधिकारी कार्यालयाबाहेर आले असताना तेथील एका कार्यकर्त्याने गिरीश महाजन यांना शिवीगाळ केली. तसेच त्याने पुढे गाड्यांवर दगडफेकही केली. या घटनेची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भाजपने या प्रकारावर व्यक्त होताना सांगितले की, संबंधत व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसून तो मद्यपी असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

भाजपचे जळगावमधील पदाधिकारी महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी माहिती देताना सांगितले की, “शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तिचा भाजपशी कोणताही संबंध नाही. तो रस्त्यावरचा मद्यपी आहे. ज्या कार्यलयात बैठक सुरु होती, त्याच कार्यालयाच्या गेटवर तो लोळत होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला हटकल्यानंतर त्याचा स्वतःवरील ताबा सुटला. मात्र त्याने दगड फेक केल्याची कोणतीही माहिती माझ्याजवळ नाही.”

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच रक्षा खडसे या भाजपच्या बैठीकाल उपस्थित होत्या. जळगाव येथे प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासमवेत आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे आणि जळगावमधील काही प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठक संपवून गिरीश महाजन जेव्हा बाहेर आले तेव्हा हा मद्यपी दरवाजातच लोळत होता. कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेले. त्यानंतर महाजन यांनी तिथेच माध्यमांशी संवाद साधला आणि ते निघून गेले. थोड्या वेळाने ते पुन्हा कार्यालयाजवळ आले असताना ही शिवीगाळ झाली असल्याचे कळते.

शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचे नाव विजय असून या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र याबाबत कुणीही तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.