..तेव्हा नवाब मलिकांचा राजीनामा का नाही घेतला, लखीमपूर घटनेवरुन दरेकरांचा पवारांना सवाल

bjp pravin darekar slams sharad pawar statment on nawab malik lakhimpur violence and anil deshmukh ed case
लखीमपूर घटनेवरून केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी, मग नवाब मलिकांच्या का नाही? दरेकरांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत लखीमपूर हत्याकांड घटनेवरून आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. यानंतर लगेचच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. लखीमपूर घटनेवरून केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या चुकीसाठी केंद्रीय गृहराज्य मंत्र्याचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र नवाब मलिक यांच्या जावयाला तर थेट अटक केली आहे. ७, ८ महिने तुरुंगात होते, मग नवाब मलिक यांचा राजीनामा मागावा का? त्यांना बरखास्त करावे का? असा सवाल प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला आहे.

यावेळी लखीमपूर घटनेवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, लखमीपूर घटनेबाबत बोलत असताना पवारांनी मावळच्या घटनेचा उल्लेख केला. मावळची घटनाही भाजपाच्या प्रोत्साहनामुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. परंतु मावळमध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम भाजपाने केला. त्यावेळी पालकमंत्री पवार होते. मात्र लखीमपूर वरून राजकारण सुरु आहे. मावळचं खापर पोलिसांवर फोडायचं दुर्देवी आणि केवीलवाणं काम सत्ताधारी पक्षाकडून होताना दिसतयं. मला आश्चर्य वाटतयं पवारांनी सांगत असताना मावळला राष्ट्रवादी पक्षाचा विजय झाला म्हटलं. मात्र विजय पराजय हा त्याठिकाणच्या घटनेचं मूल्यमापन करणाच्या गोष्टी नसतात.

“महाविकास आघाडी सरकारचा जो मेन आक्रोश आहे की, ईडी, एनसीबी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर किंवा राजकीय वापर होतोय. मात्र पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडून या तपास यंत्रणांचं अभिनंदन करण्याऐवजी टीका केली जात आहे. या तपास यंत्रणांनी वाझेचे धागेदोरे शोधून काढल्याने राष्ट्रवादी काँग्रसेच्या गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. त्यातूनच अशाप्रकारच्या टीका होत आहे. याप्रकरणाचा न्यायालयात सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरु आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करणे उचित नाही. गृहमंत्र्यांची अनेकवेळा पाठराखण केली गेली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते गेले मात्र तिथेही त्यांची बाजू लंगडी ठरली. त्यामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. असाच राजीनामा दिला नाही. असेही दरेकर म्हणाले.

यावेळी दरेकरांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर बोलताना, परमबीर सिंह कुठे आहेत? चौकशी करणारे अधिकारी पण फरार आहेत. पण ज्यांची चौकशी आहे तेही फरार आहेत. त्यावर सरकार सोयीने भाष्य करीत नाही. म्हणजे पाच-पाच वेळेला समन्स देऊनही गृहमंत्री फरार आहेत. त्यांच्या फरारीवर भाष्य नाही. परंतु परमबीर सिंह कुठे आहेत? अशी प्रकारची अपेक्षा व्यक्तं करणं विचार करण्यासारखे आहे. अशी टीका दरेकरांनी केली.

नवाब मलिकांवरही दरेकरांनी जोरदार निशाणा साधला आहे. “नवाब मलिक ड्रग्ज तस्करांची बाजू घेऊन यंत्राणांना बदनाम करतं असतील तर ते थांबवण्याचा सल्ला पवारांनी दिला पाहिजे होता. पवारांच्या व्यक्तव्यामुळे यंत्रणांना बळ मिळण्याऐवजी ड्र्ग्ज तस्करांना बळ मिळातयं. राष्ट्रवादीचे नेते तस्करांची बाजू घेऊन यंत्रणांवर टीका करतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये किती रोष आहे ते रोज दिसून येते.” असेही दरेकर म्हणाले.