भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा कॅबिनेटमध्ये समावेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शपथ घेतल्यानंतर आता अन्य नेत्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे.

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला. यामध्ये शिंदे गट आणि भाजप अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शपथ घेतल्यानंतर आता अन्य नेत्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री

चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी एका मध्यमवर्गीय मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. मुंबईमधील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे लहानपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून 1985 साली त्यांनी पदवी प्राप्त केली.

मुंबईत असताना शालेय वयापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच पक्षात जोमानं काम केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जातात. पुणे पदवीधर मतदार संघातून दोन वेळा विधानपरिषदेवर विजयी झाले आहेत.

हेही वाचा : Live Update : भाजपाकडून मंगलप्रभात लोढा यांनी घेतली शपथ

2014 मध्ये चंद्रकांत पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी

2004मध्ये चंद्रकांत पाटील भारतीय जनता पार्टीत सामील झाले आणि 2013मध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. 2014 साली भाजपचं सरकार आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली. शिवसेना आणि भाजपला एकत्र आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

ऑक्टोबर 2014मध्ये त्यांची महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली. तर जुलै 2016 पासून ते कॅबिनेट मंत्री पदावर होते. त्यांनी महसूल, मदत आणि पुनर्वसन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हाताळलं आहे. 2019 ला पुण्यातील कोथरूड मतदार संघातून ते भाजपचे आमदार झाले.


हेही वाचा : भाजपाकडून राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतली मंत्रिपदाची पहिली शपथ, राजकीय कारकीर्द काय?