Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्र Ashok Chavan : काँग्रेसची स्थिती 72 वरुन 42 आणि 16 पर्यंत खाली...

 Ashok Chavan : काँग्रेसची स्थिती 72 वरुन 42 आणि 16 पर्यंत खाली का आली? भाजप नेत्याने लगावला टोला

Subscribe

शिर्डी – लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांची राज्यसभेवर वर्णी लावली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची मुलगी श्रीजया यांचा चव्हाण कुटुंबियांच्या पारंपरिक भोकर मतदारसंघातून विजय झाला आहे. यानंतर अशोक चव्हाण सहकुटुंब शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आणि काँग्रेसला खडे बोल सुनावले आहे. काँग्रेसची अवस्था 72 वरुन 42 आणि 16 पर्यंत खाली का आली, याचे त्यांनी आकलने केले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेस काळात मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांचे नाव आदर्श सोसायटी घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या घोटाळ्याने त्यांची पाठ सोडली नाही. 2019 च्या लोकसभेच्या अखेरच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आदर्श घोटाळ्याचा व्हाईट पेपर काढण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पुढील काही दिवसांतच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. भाजप प्रवेशावर अशोक चव्हाण म्हणाले, “मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीनं मी 14 वर्ष वनवास भोगला त्यामुळे मला भावना व्यक्त कराव्या लागल्या. पण मला कोणाबद्दल वैयक्तीक आकस नाही.”

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपला काहीही फायदा झाला नाही. नांदेड लोकसभेत भाजपचे प्रतापराव चिखलीकरांचा पराभव झाला. 23 नोव्हेंबरला झालेल्या पोटनिवडणुकीतही पुन्हा काँग्रसचा विजय झाला. दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र हे काँग्रेसचे उमेदवार तिथून निवडून आले. मात्र नांदेड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यात अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांचाही विजय झाला. भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला आहे. यानिमित्ताने चव्हाण कुटुंब आज शिर्डी येथील साई समाधीच्या दर्शनासाठी आले.

- Advertisement -

नाना पटोले, पृथ्वीराज बाबांवर निशाणा 

साईबाबांच्या दर्शनानंतर अशोक चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चव्हाण कुटुंबाची साईबाबांवर श्रद्धा आहे. कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी आम्ही साईंबाबांचे दर्शन घेतो. काँग्रेसला राज्यात 16 जागा मिळाल्या त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसने आत्मपरीक्षण करावं, पक्षाची एवढी दयनीय अवस्था का झाली? चव्हाण म्हणाले की, मी राज्याचा प्रमुख असताना 72 जागा निवडून आल्या, पृथ्वीराज बाबा आले आणि 82 च्या 42 केल्या आणि आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 वर आणल्या. नाना पटोलेंवर निशाणा साधताना ते म्हणाले की, त्यांनी परिस्थितीचं आकलन करावं. पक्षात जुने जानते नेते आहेत असं म्हणत त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता टोला लगावला. चव्हाण म्हणाले की, मी साई बाबांचा भक्त आहे. त्यांच्या दर्शनाला आलो आहे. रागाच्या भरात कोणाबद्दल काही जास्त बोलून गेलो असेल तर मनावर घेऊ नये, असंही ते म्हणाले.

हेही वाचा : Shiv Sena : एकनाथ शिंदे तातडीने दरे गावी जाण्याचे कारण आले समोर; उदय सामंत म्हणाले, नाराजीचे कारण…

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -