मुंबै बँक अध्यक्ष निवडणुकीत दरेकरांना झटका बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती

mumbai bank

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी अर्थात मुंबै बँकेवर पुन्हा वर्चस्व ठेवण्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मनसुब्यांना गुरुवारी जोरदार धक्का बसला. बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र देत दरेकर यांना झटका दिला. बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे निवडून आल्याने ही बँक भाजपच्या हातातून निसटली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत पराभूत झाल्याने बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीने मुंबै बँकेच्या अध्यक्ष निवडणुकीत बाजी मारत अपयश भरून काढले आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलच्या २१ जागा निवडून आल्या होत्या. या पॅनलमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश होता. मात्र, गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्यावेळी पडद्याआड वेगळी खेळी खेळली गेली.

बँक अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युती करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची गुरुवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला. युतीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित मिळून ११ जागा झाल्या, तर भाजपकडे अवघ्या ९ जागा शिल्लक राहिल्या.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली आहेत. भाजपकडे १० मते होती, विष्णू भुंबरे हे फुटले, त्यामुळे महाविकास आघाडीला ११ मते मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून मोठा दबाव निर्माण केला. सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली,असा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला.

मजूर विभागातून दरेकर निवडून आले होते. मात्र, ते मजूर नसल्याने त्यांचे सदस्यत्व सहकार विभागाने रद्द केले आहे. मात्र, बँक प्रतिनिधी म्हणून दरेकर सध्या बँकेचे सदस्य कायम आहेत. दरेकर आणि प्रसाद लाड हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत.

ईश्वर चिट्ठीत भाजपला उपाध्यक्षपद
अध्यक्षपदावर महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी उपाध्यक्षपद भाजपच्या गळ्यात पडले आहे. उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपद निवडण्याचे ठरले. यामध्ये भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी बाजी मारली.

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तीन दिवसांपासून बैठका घेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपच्या प्रविण दरेकरांना धक्का देउ शकतो अशी रणनिती आखली. या रणनितीनुसार निवडून आलेल्या सर्व 20 संचालकांशी सतत चर्चा सुरू ठेवली. गुरूवारी सकाळी निवडणुकीच्या दिवशी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.

त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे 11 संचालकांचे बहुमत असू शकते, असे लक्षात घेता अध्यक्षपदाची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचे ठरले. त्यानुसार राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले, तर भाजपचे प्रसाद लाड पराभूत झाले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र भाजपचे विठ्ठल भोसले विजयी झाले. आपलं महानगरला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये एक -एक वर्षाचे अध्यक्षपद अशी विभागणी करण्यात आली असून पहिल्यावर्षी सिद्धार्थ कांबळे यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.