बीएमसीचे खोके, मातोश्री ओके; भाजप -शिंदे गटाची ठाकरेंविरोधात घोषणाबाजी

BJP-Shinde group slogans against Thackeray on BMC, Matoshree thackeray govt ajit pawar

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरु आहे. आज अधिवेशनाच्या कामकाजाचा पाचवा दिवस आहे. गेले चार दिवस वादळी ठरलेल्या या अधिवेशनात विविध मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, यात विरोधकांकडून गेल्या चार दिवसांपासून अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जात आहे. ईडी कारवाया, ओला दुष्काळ, आमदारांची बंडखोरी अशी अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी तुफान घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली आहे. यात आज भाजप -शिंदे गटाने बीएमसीचे खोके, मातोश्री ओके, महापालिका स्टँडिंग कमिटीचे खोके, मातोश्री ओके, लवासाचे खोके, सिल्व्हर ओक ओके… अशी घोषणाबाजी केली.

यावेळी भाजप- शिंदे गटातील आमदार प्रसाद लाड, भरत गोगावले, निरंजन डावखरे, भारती लव्हेकर यांच्यासह अनेक नेते सामील झाले होते.

पावसाळी अधिवेशनपूर्वी आज भाजप- शिंदे गटाच्या आमदारांच्या घोषणा लक्ष्यवेधी ठरल्या, या घोषणांतून त्यांनी विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी कोविडच्या भितीने राजा बसला घरी… हवालदिल जनता फिरली दारोदारी… युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी… भ्रष्टाचाराचे खोके पोहचले यांच्या घरोघरी.. अशा आशयाचे बॅनर झळकवत घोषणाबाजी केली. तसेच पक्ष टिकवण्यासाठी लढणारे गद्दार! पक्ष संपवणारे यांच्यासाठी मोठे खुद्दार!! खुर्चीसाठी केले हिंदुत्व हद्दपार!!! खुर्चीत बसल्यावर शिवसैनिक केले वेशीपार खुर्ची गेल्यावर आता फिरतात दारोदार!! असे आशयाचे बॅनर झळकवत उद्धव ठाकरेंना डिचवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई महापालिकेतील आर्थिक घोटाळा, लवासा वाद, सचिन वाझे प्रकरण, नवाब मलिक यांची अटक अशा विविध मुद्द्यावरून भाजप शिंदे गटाने मागील महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.