Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भाजप-शिवसेनेकडून आजपासून राज्यात सावरकर गौरव यात्रेला सुरुवात

भाजप-शिवसेनेकडून आजपासून राज्यात सावरकर गौरव यात्रेला सुरुवात

Subscribe

आजपासून राज्यभरातील विविध जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्यावतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या 6 एप्रिलला या यात्रेची सांगता होणार आहे.

महाराष्ट्रात आजपासून भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्या विरोधात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून राज्यभरातील विविध जिल्ह्यात ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या 6 एप्रिलला या यात्रेची सांगता होणार आहे.

ठाण्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ही यात्रा ठाणे शहरातील विविध भागात जाणार आहे. तसेच मुंबईमध्ये देखील भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सावरकर गौरव यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कांदिवली पश्चिम येथे निघणाऱ्या सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी होऊन उपस्थित नागरिकांना संबोधित करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच याच शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा देखील काढली जाणार आहे. या यात्रेला दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज छत्रपती संभाजी नगरमध्ये सभा आणि यात्रा यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.

शिवसेनेकडून (शिंदे गट) ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न
आजपासून राज्यात सुरू होणाऱ्या सावरकर गौरव यात्रेसाठी शिवसेना आणि भाजपकडून देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. तसेच, या यात्रेचा एक टीजर देखील शुक्रवारी (ता. ३१ मार्च) भाजपकडून प्रदर्शित करण्यात आला होता. तर या यात्रेची तयारी सुद्धा दोन्ही पक्षांकडून दोरदार करण्यात आली आहे. असे असताना आता शिवसेनेकडून सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

शिवसेनेने दादर परिसरात काही ठिकाणी बॅनरबाजी केलेली पाहायला मिळाली. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावण्यात आला होता. तसेच, या बॅनरवर “सत्तेसाठी आहेत लाचार, सोडून दिला सावरकरांचा विचार, आम्हाला आहे बाळासाहेबांची साथ, सावरकर विरोधकांच्या घालू पेकटात लाथ”, असा आशय लिहिण्यात आलेला. पण असे बॅनर लावण्यास परवानगी नसल्याने पोलिसांकडून हे बॅनर तात्काळ हटवण्यात देखील आले.


हेही वाचा – पोलिसांच्या अटीशर्तींसह छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची आज जाहीरसभा

- Advertisment -