Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रBJP : भाजपा मराठा समाजाच्या पाठीशी; आमदार-पदाधिकारी गावागावात पोहचवणार संदेश

BJP : भाजपा मराठा समाजाच्या पाठीशी; आमदार-पदाधिकारी गावागावात पोहचवणार संदेश

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य टिकेनंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला. भाजपा हा मराठा समाजाच्या पाठिशी आहे आणि यापुढेही राहणार आहे. याआधी भाजपा सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला होता आणि तो न्यायालयात टिकवलाही होता. त्यामुळे भाजपा कायमच मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचा संदेश आपापल्या मतदारसंघातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. (BJP stands with the Maratha community MLA Officers will deliver the message to villages)

हेही वाचा – Jarange VS Fadnavis : फडणवीसांना दुसऱ्यांदा आंतरवाली घडवायची होती, पण…; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजानंतर भाजपा आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आशीष  शेलार, प्रवीण  दरेकर आदी उपस्थित होते, तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीत उपस्थित नव्हते. बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून  निर्माण झालेल्या परिस्थितीची चर्चा करण्यात आली.

आरक्षणाचा मुद्दा आपण  संयमाने हाताळायला हवा, असे सांगतानाच विविध सूचना उपस्थितांना करण्यात आल्या. भाजपा  मराठा समाजाच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, ही बाब आपापल्या मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. मनोज जरांगे पाटील वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत आहेत. भाजपा मराठा समाजाच्या पाठिशी होता आणि यापुढेही राहणार आहे. यापूर्वीही भाजपा सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय उच्च न्यायालयात टिकला. भाजपाने सत्तेत असेपर्यंत आरक्षणाचा निर्णय न्यायालयात टिकवला. त्यानंतर जे  सत्तेत आले त्यांच्यावर आरक्षण टिकविण्याची जवाबदारी होती. मात्र, ते मुख्यमंत्री न्यायालयात आरक्षण टिकवू शकले नाहीत. त्यामुळे या सर्व बाबी नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना उपस्थिताना देण्यात आल्या.

हेही वाचा – Congress : मुख्यमंत्री-पटोलेंमधील संवादानंतर काँग्रेसचे ट्वीट; उद्या जर जरांगेंचा जीव गेला तर…

आता महायुतीच्या सरकारने नव्याने दिलेले मराठा आरक्षणही न्यायालयात टिकेल, हा विश्वास लोकांना देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी भाजपा आमदारांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या विधानांविषयी नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या सूचना भाजपा आमदारांना देण्यात आल्या. आरक्षणासोबतच मराठा समाजासाठी महायुती सरकारच्या काळात सुरू केलेल्या योजनांचीही माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.