घरमहाराष्ट्रपुणेतीन महिन्यात पुण्यात भाजपला बसले तीन मोठे धक्के

तीन महिन्यात पुण्यात भाजपला बसले तीन मोठे धक्के

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज बुधवारी (ता. २९ मार्च) प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. पण त्यांच्या जाण्याने भाजपला पुण्यात तीन महिन्यात तीन धक्के बसले आहेत.

Girish Bapat Passed Away : गेल्या काही महिन्यांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) हे कर्करोगाच्या आजाराशी लढत होते. पण आज अखेरीस त्यांची ही लढत अपयशी ठरली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. पण गेल्या तीन महिन्यात भाजपला पुण्यातील तीन मोठे नेते आजारामुळे गमवावे लागले आहेत. ज्यामुळे पुण्यातील राजकारणात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जानेवारी महिन्यामध्ये पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांचे निधन झाले. त्यानंतर लगेच फेब्रुवारी महिन्यात कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे देखील निधन झाले. पुण्यातील या दोन्ही आमदारांना कर्करोगामुळे आपला जीव गमवावा लागला होता. तर आता लगेच मार्च महिन्यात खासदार गिरीश बापट यांचे सुद्धा कर्करोगामुळे निधन झाले आहे.

- Advertisement -

गिरीश बापट हे पुण्यातील भाजपचे दिग्गज राजकारणी होते. पुण्याच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) हे विजयी झाले. पण त्यांनी देखील रुग्णालयात जाऊन बापट यांची भेट घेतली. तर 1968 नंतर बापट यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच भाजपने पोटनिवडणूक लढविली होती.

गिरीश बापट हे तब्बल पाच वेळा कसबा पेठ विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते. तर २०१९ मध्ये पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवून ते खासदारपदी विजयी झाले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारी असताना देखील व्हिलचेअरवर बसून त्यांनी कसबा पेठच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आयोजित केलेल्या केसरी वाड्यातील बैठकीला हजेरी लावली होती. तर त्यावेळी त्यांनी भाषण देखील केले होते. जे भाषण त्यांचे शेवटचे भाषण ठरले.

- Advertisement -

दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनामुळे राज्यासह देशभरातील राजकीय नेत्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील “श्री गिरीश बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते, ज्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा हात आहे.” असे ट्वीट केले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत बापट यांना श्रद्धांजली वाहिली.


हेही वाचा – ‘महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली’; राज ठाकरेंनी व्यक्त केला शोक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -