घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी?

देवेंद्र फडणवीसांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी?

Subscribe

राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजपने केल्याचं बोललं जात आहे.

राज्यात सर्वाधिक १०५ जागा जिंकून देखील भाजप सत्तेबाहेरच राहिल्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यात कोंडी झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. सत्तास्थापनेच्या गोंधळामध्ये शिवसेनेकडून सातत्याने टार्गेट केले गेलेले देवेंद्र फडणवीस यांना आधीपासून असलेले एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता यांच्यासारखे पक्षांतर्गत विरोधक देखील आता त्यांच्याविरोधात उभे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेण्याचा विचार केंद्रीय भाजपकडून सुरू आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या ७ सदस्यांचा कार्यकाळ संपत असून त्याजागी राज्यातून कुणाला पाठवायचं, याची खलबतं सर्वपक्षीय पातळीवर होऊ लागली आहेत. या सातपैकी भाजपकडून ३ जण विजयी होतील अशी गणितं जुळून आली आहेत.

फडणवीसांसाठी कुणाचा पत्ता कट होणार?

देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेमध्ये पाठवून केंद्रात मंत्रिमंडळात घेण्याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर एखाद्या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन त्यांच्यातील कौशल्याचा वापर करून घेण्याचा भाजपच्या केंद्रीय वर्तुळातील ज्येष्ठ नेत्यांचा विचार आहे. भाजपकडून विद्यमान राज्यसभा सदस्य अमर साबळे, अजय संचेती, उदयनराजे भोसले यांची नावं देखील चर्चेत आहेत. त्यासोबतच, रामदास आठवलेंची टर्म देखील संपत असून त्यांचंही पुनर्वसन भाजपला करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेत पाठवायचं झाल्यास यापैकी कुणाचातरी पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उदयनराजेंसाठी रामदास आठवलेंच्या खासदारकीवर संकट?

आठवले, उदयनराजे हेदेखील खासदारकीच्या तयारीत

लोकसभा निवडणुकांआधी भाजपसोबत जाताना रामदास आठवले यांना राज्यसभा सदस्यत्वाचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. त्यासोबतच, उदयनराजे भोसले यांनादेखील सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेत पाठवण्यात येईल असं सांगितल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विद्यमान सदस्य अमर साबळे यांच्या खासदारकीवरच गदा येण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -