(BJP Vs SS UBT) नागपूर : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कथित ‘शीशमहल’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. यावरून ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांच्या खर्चाचा लेखाजोखा मांडत जोरदार टीका केली आहे. तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. (Bawankule’s counter attack on Uddhav Thackeray criticizing Modi)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखाद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. मोदी यांनी जगभ्रमणासाठी 15 हजार कोटी रुपयांचे विमान खरेदी केले. याआधीचे पंतप्रधान एअर इंडियाच्या नियमित विमानाने प्रवास करीत, पण मोदी यांचा तोराच वेगळा. मोदी हे 10-15 लाखांचा सूट आणि त्या सुटावर तितक्याच किमतीचे ‘पेन’ खोचतात. एखादा झोलाछाप फकीर ही उधळपट्टी स्वतःच्या झोल्यातून कशी काय करू शकेल? त्यामुळे हा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा – SS UBT on Modi : झोलाछाप फकीर स्वतःच्या झोल्यातून…, ठाकरे गटाची घणाघाती टीका
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळ यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अडीच वर्षे घरात बसून ‘अतिविलास‘ करणारे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. विलासी असा आरोप करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांचा जीवनप्रवास बघावा. एक चहावाला पंतप्रधान होतो, तेव्हा तो त्यांच्या साधेपणाने आणि मेहनतीनेच, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील देशाचा विकास होत आहे. मोदी यांनी आपल्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच साधेपणा जपला आहे. मात्र, त्यांचा साधेपणा ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या उद्धव ठाकरे यांना दिसणार नाही. त्यामुळेच ते दिल्लीत शीशमहल बांधणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या मदतीला धावून आले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
पंतप्रधानांचे परदेश दौरे देशाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी असतात. भेटवस्तूंचा विषय उगाच गाजवून देशातील विकासावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. भारताचे जागतिक स्थान उंचावले गेले आहे, याचा तुम्हाला खरा त्रास होत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. (BJP Vs SS UBT : Bawankule’s counter attack on Uddhav Thackeray criticizing Modi)
हेही वाचा – Delhi Elections 2025 : केंद्रीय मंत्र्यांच्या घरांवर किती उधळपट्टी झाली? ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा