महाराष्ट्रात भाजपाची पुनर्रचना होणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

chandrashekhar bawankule
संग्रहीत छायाचित्र

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील अपयश आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पराजयामुळे भाजपा नेत्यांनी चिंतन करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपामध्ये लवकरच पूनर्रचना होणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मात्र, पक्षातील ही पुनर्रचना निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यामुळे नाही तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा, आधुनिक महिला धोरण ठराव मांडणार

येत्या महिन्याभरात राज्यात काही पुनर्रचना केल्या जाणार आहेत. मी सहा महिन्यांपूर्वी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर पुनर्रचना करण्याचा विचार होताच. पण राज्यभर प्रवास करून नंतर पुनर्रचना करावी असा विषय होता. काही ठिकाणी पुनर्रचना होईल, काही ठिकाणी नवे जिल्हाध्यक्ष येतील. काही ठिकाणी प्रदेशावर पुनर्रचना होईल. पण येत्या महिना-दीड महिन्यांत पुनर्रचना होईल”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

पुनर्रचना म्हणजे पक्षाची कार्यकारिणी असते. निवडणुकीचा काळ असल्याने अनेक कार्यकर्त्यांना त्या त्या भूमिकेत यावं लागतं. राज्यातले पदाधिकारी वेगळ्या भूमिकेत येतात. अनेक रचना कराव्या लागणार आहेत. त्यामुळे योग्य कार्यकर्ता व नेत्याला योग्य काम देणं आणि निवडणूक जिंकण्याचं लक्ष्य यासाठी आम्ही पुनर्रचना करणार आहोत”, असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – Women’s Day : नागालॅण्डमध्ये महिला मंत्र्याचे पंतप्रधानांकडून कौतुक, महाराष्ट्रात महिला मंत्री कधी?

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान माजवले आहे. त्यामुळे मेटाकुटीला आलेला बळीराजा आता आणखी संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिवेशन काळातच भरपाईचा देण्याचा निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. काही आमदार आज अधिवेशनात याबाबत मागणी करणार आहेत. शेतकऱ्यांची होळी अश्रूंमध्ये गेली आहे. त्यामुळे सरकार त्यांना जास्तीत जास्त मदत देईल, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवला.