सावंतवाडीत केसरकरांचा गड ढासळला, भाजपचे संजू परब नगराध्यक्ष

सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नारायण राणेंची सरशी झाली असून त्यांनी हे पद शिवसेनेच्या हातातून खेचून घेतलं आहे. भाजपचे संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकरांचा पराभव केला आहे.

narayan rane deepak kesarkar
नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर

एकीकडे मुंबईत नव्या ठाकरे सरकारच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे कोकणात भाजपनं शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडीमध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा तब्बल ३०९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपच्या गोटामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून इथे शिवसेनेचाच नगराध्यक्ष होता. मुळात दीपक केसरकर यांचा हा गड मानला जात होता. त्यामुळे दीपक केसरकर विरूद्ध नारायण राणे अशा प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीमध्ये भाजपची सरशी झाली आणि सावंतवाडीचं नगराध्यक्षपद शिवसेनेच्या हातून निसटलं. सावंतवाडी येथील जिमखाना परिसरात आज मतमोजणी झाली.

दोघांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची!

निवडणुकांच्या आधी भाजपचे रवींद्र चव्हाण, नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे सावंतवाडीमध्येच तळ ठोकून बसले होते. संजू परब हे कट्टर राणे समर्थक असून, निलेश राणे यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ही लढाई भाजप विरुद्ध शिवसेना अशी नव्हती तर ही लढाई राणे विरुद्ध दीपक केसरकर अशी होती. निवडणूक काळात सावंतवाडीमध्ये आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या कामाचा पंचनामा करणारा व्हीडिओ देखील केला होता. त्यामुळे सावंतवाडीमधील या नगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपच्या संजू परब यांचा विजय निश्चित झाला.