नागपूर : मुसळधार पावसाने शनिवारी नागपूर शहराला झो़डपले असून अवघ्या 4 तासात 100 पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे नागपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसामुळे सुमारे 400 जणांचे सुखरूप स्थलांतर करण्यात आले. तर, सरकारने यात नुकसान झालेल्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे.
हेही वाचा – समोर एक ‘सवत’ दिमाखात उभी करून…, संजय राऊत यांची मोदी सरकारवर रोखठोक टीका
नागपुरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस कोसळल्याने नागपूरचे जनजीवन विस्कळित झाले. या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, पावसाचा जोर पाहून सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
शहर नियोजनाच्या दृष्टीकोनातून भाजपशासित नागपूर पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सद्याच्या पूरस्थितीवरून स्पष्ट होते. भाजप प्रशासनाकडून पुरजन्य नाग नदी स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्वच्छ करण्यात आली नाही. नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी २,११७ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावाही… pic.twitter.com/WMXAQseVlf
— NCP (@NCPspeaks) September 23, 2023
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला आहे. शहर नियोजनाच्या दृष्टीकोनातून भाजपाशासित नागपूर पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सद्याच्या पूरस्थितीवरून स्पष्ट होते. भाजपा प्रशासनाकडून नाग नदी स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्वच्छ करण्यात आली नाही. नागनदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 2117 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावाही फोल ठरला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
नागपूर महानगरपालिकेवर तब्बल 16 वर्षं भाजपा सत्तेत असूनही पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. परिणामी संपूर्ण नागपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. येत्या निवडणुकीत नागपूरकर जनता आपल्या मतदानाच्या अधिकारातून भाजपाला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
हेही वाचा – पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर झळकले
शासनाकडून पूरग्रस्तांना मदत
मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या स्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एक बैठक बोलावून आढावा घेतला. नागपूर पूरग्र्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीनंतर केल्या.