Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नागपूर भाजपाची नवी कार्यकारिणी बावनकुळेंकडून जाहीर; बाराशे सदस्यांची जम्बो टीम

भाजपाची नवी कार्यकारिणी बावनकुळेंकडून जाहीर; बाराशे सदस्यांची जम्बो टीम

Subscribe

नागपूर : भाजपची नवीन कार्यकारिणी आज (3 मे) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत तब्बल बाराशे सदस्यांची जम्बो टीम असणार आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी सज्ज होणार असून ४८ लोकसभा आणि विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चारही केला.

जुन्या कार्यकारिणीला साडे तीन वर्षे झाली असून दर तीन वर्षांनी भाजपाच्या कार्यकारिणीची नव्याने रचना केली जाते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी १२ ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष पदचा पदभार स्वीकारला. त्यांना जम्बो टीम तयार करण्यासाठी ९ महिने लागले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही तितकाच अवधी बाकी आहे. नवीन कार्यकारिणीत राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित अशी सुमारे बाराशे जणांची टीम असणार आहे.

- Advertisement -

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आज जाहीर होणार आहेत तर, नवीन जिल्हाध्यक्षांची टीम या महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. याशिवाय संघटनात्मक बदलाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

ठाकरे नावाची नाटक कंपनी
नव्या कार्यकारिणीच्या पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अमित शहा यांना भुईसपाट करण्याची भाषा करणारे ठाकरे कधी भूईसपाट होतील, हे त्यांना देखील कळणार नाही. ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. आधी ते बारसूच्या बाजूने होते, आता नौटंकी करत आहेत. त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत स्वत:ची संख्या बघावी. तुम्ही सहाव्या क्रमांकावर आहात, त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर समोर आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी लगावला.

- Advertisement -

संजय राऊत यांना सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा
यावेळी बावनकुळे संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, तीन वर्षांपासून तुमचा भोंगा वाजतो आहे. आमचे मुख्य विशेष प्रवक्ते नितेश राणे यांनी उत्तर दिल्यावर त्यांचा अवमानकारक उल्लेख करतात. संजय राऊतांना सिंधुदुर्गातून निवडणूक लढवण्यास सांगा मग कळेल, असे आव्हानही बावनकुळे यांनी ठाकरेंना दिले.

- Advertisment -