घरमहाराष्ट्रभाजपचा प्लॅन बी तयार; आमदार अपात्रता प्रकरणात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता

भाजपचा प्लॅन बी तयार; आमदार अपात्रता प्रकरणात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता

Subscribe

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नजीकच्या काळात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत अपात्र ठरविल्यास सरकार वाचविण्यासाठी भाजपाने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचा पहिला  पर्याय असतील. याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशी नावे चर्चेत आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. (BJPs Plan B ready MLA disqualification case is likely to have major political developments)

हेही वाचा – नितेश राणे, गोपीचंद पडळकर एकाच माळेचे मणी; अजित पवार गटाचं प्रत्युत्तर

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने त्यातील 16 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिंदे यांना  दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांचे समर्थन आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांनी आपला गट अन्य पक्षात विलीन करायला हवा. मात्र, त्याऐवजी शिंदे यांनी आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. या दाव्याला भारत निवडणूक आयोगानेही मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर  सर्वोच्च न्यायालयाने 11 मे 2023 रोजी शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे  न्यायालयाने निकालात म्हटले होते.  मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याने उद्धव ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर 18 सप्टेंबर रोजी सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने  पुढील एका आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात करावी, असे निर्देश दिले. तसेच  न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करण्याची सूचना केली आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे गटाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – …हेच आरबीआयच्या रिपोर्टचे सार आहे, जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारवर निशाणा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेची सुनावणी गुणवत्तेवर आणि घटनेतील तरतुदींनुसार घ्यावी लागणार आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश फूट वैध मानली जाते. मात्र, त्याचवेळी हा गट अन्य पक्षात विलीन व्हायला हवा, अशी तरतूद आहे. शिंदे गटाने या तरतुदीला बगल दिली आहे. त्यामुळे या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास भाजपाला नवा मुख्यमंत्री निवडावा लागले. भाजपाचे  विधानसभेतील 105 आमदार,अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे 40 आमदार त्यामुळे भाजपासमोर विधानसभा सभागृहात बहुमताची अडचण नाही. फक्त आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडावा लागणार आहे. भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन मिळाल्यानेच अजित पवार भाजपासोबत गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते. तथापि, भाजपाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकीय धक्कातंत्राचा अनुभव घेता मुख्यमंत्रिपदासाठी नवे नाव पुढे येऊ शकते.

अपात्रतेची टांगती तलवार असलेले आमदार

एकनाथ शिंदे , महेश शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, लता सोनवणे, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, प्रा. रमेश बोरनाळे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -