विरोधकांऐवजी मित्रपक्षांना संपवण्याचे भाजपचे धोरण

उद्धव ठाकरेंनी केले नितीश कुमारांच्या निर्णयाचे कौतुक,महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश,मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत घेतली बैठक

uddhav thackeray

विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना आधी संपवणे हे भाजपचे धोरण मला २०१९मध्येच समजले होते. त्यामुळेच मी वेगळा झालो. जे मला २०१९ला समजले ते बिहारच्या नितीश कुमारांना आता कळाले, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.

शिवसेनेत झालेले बंड, मुंबईतील ४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिलेले समर्थन या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुंबई महापालिका निवडणुकीचे आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असून ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनात मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बिहारमधील राजकीय घडामोडींवर तसेच शिंदे गटावर भाष्य केले.

शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार, खासदार निवडून येऊच शकत नाहीत. गेल्या महापालिका निवडणुकीतही आपण भाजपविरोधात लढलो आणि जिंकलो. त्यामुळे या निवडणुकीतही आपणच जिंकणार, असा दावा ठाकरे यांनी बैठकीत केला. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हाही शिवसेनाच जिंकली होती. त्यामुळे यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीमध्येही असेच चित्र राहील. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संपर्क, लोकांचे प्रश्न आणि संघटन यावर भर द्या, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जिंकणारच आणि तेही तुमच्याच सर्वांच्या जीवावर, असा आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. एकनाथ शिंदे गटाला महत्त्व न देता महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, असा आदेश देतानाच आपली लढत ही शिंदे गटाशी नव्हे, तर भाजपशीच असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे. त्यामुळे तुम्ही ही कामे करीत राहा. वॉर्डामध्ये फिरा, असा कानमंत्र देत जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही. शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. तुम्ही जनतेची कामे करीत राहा. सामाजिक बांधिलकी सोडू नका आणि कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. पावसाळा अर्धा उलटला असून या स्थितीत कोरोना, स्वाईनसारख्या आजारांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा काळात मुंबईकरांच्या मदतीला धावून जा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनाही टोला लगावला. या विस्तारावरून नाराजीचा तर सूर आहेच, पण ज्यांना याबाबत आत्मविश्वास होता त्यांनादेखील माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे हा विस्तार काहींसाठी गोड तर काहींना मात्र कडवट असल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडू यांच्यावर टीका केली.

दरम्यान, या बैठकीला १३ माजी नगरसेवक अनुपस्थित होते, मात्र या बैठकीचा निरोप काल दुपारनंतर गेला होता. जे आज अनुपस्थित होते त्या सगळ्यांनी त्यांची कारणे पक्षाला कळविली होती, अशी माहिती बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.