घरमहाराष्ट्रCorona Treatment: तीन दशकात पहिल्यांदाच आढळला काळ्या बुरशीचा आजार, टास्क फोर्सने सांगितले...

Corona Treatment: तीन दशकात पहिल्यांदाच आढळला काळ्या बुरशीचा आजार, टास्क फोर्सने सांगितले कारण

Subscribe

देशात कोरोनाची परिस्थितीत अधिक गंभीर होत असताना तीन दशकात पहिल्यांदाच काळ्या बुरशीचा आजार आढळल्याचे समोर आले आहे. काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव विदर्भ आणि मराठवाडा या भागातील कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये वाढताना पाहायला मिळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोना रुग्णावर उपचार करताना स्टेरॉइडचा अधिकचा वापर काळ्या बुरशीच्या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतो, असे मत राज्यातील टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलं आहे.

विदर्भ आणि मराठवाडा येथील कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार वाढत असल्याने डॉ. ओक यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासह कोरोनावर उपचार घेतल्यानंतर अशा प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स किंवा असा आजार होण्यामागे दोन ते तीन कारणे असल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे. अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. कोरोनाच्या आजारात ९ दिवसांपेक्षा अधिक काळ स्टेरॉइड दिली गेली असतील. स्टेरॉइड डोसचे प्रमाण अतिशय मोठ्या स्वरुपात असेल, तर अशा प्रकारचा आजार बळावू शकतो, असे डॉ. ओक यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, काळ्या बुरशीला म्युकोरमायकोसीस असे म्हटले जाते. हा आजार रेअर असून, हा तीव्र बुरशीचा आजार आहे. गेल्या तीन दशकांमध्ये अशा प्रकारचा आजार सामान्यपणे आढळून आलेला नव्हता. मात्र, गेल्या दीड वर्षात काळ्या बुरशीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत असल्याचे असे डॉ. ओक यांनी सांगितले आहे. डॉ. ओक यांनी काळ्या बुरशीच्या परिणामाविषयी सांगताना त्याच्या अत्यंत धोकादायक दुष्परिणामांची देखील माहिती दिली. काळ्या बुरशीचा आजार हा डोळ्यांजवळ, तसेच गालावरील हाड येथे बहुतांश केसेसमध्ये आढळतो. हा आजार इतका तीव्र असतो की, प्रसंगी दृष्टी जाऊ शकते, डोळाही काढावा लागू शकतो. गालावरील हाडाजवळ हा रोग झाल्यास तो भाग काढून टाकावा लागू शकतो. तोंडाजवळ झाल्यास जबडा काढून टाकावा लागू शकतो, इतक्या भयंकर परिणाम काळ्या बुरशीचा होऊ शकतो. किंबहुना शेवटी मृत्यूही होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -