नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गालगत पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेडरोड येथील रहदारीच्या ठिकाणी असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी अवघ्या १३ मिनिटांत 28 लाख 35 हजार रुपयांची लूट केल्याची घटना घडली.
नाशिकसह जिल्ह्यात होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नाशिक शहर पोलिसांसह ग्रामीण पोलीस हैराण झाले आहेत. एक घटना होत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारीचे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच परराज्यातील टोळ्याही जिल्ह्यात कार्यरत असल्याचे अनेक घटनांवरुन दिसून येत आहे. पिंपळगाव बसवंत शहरातील चिंचखेड चौफुलीवर असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम शनिवार मध्यरात्री तीनच्या सुमारास तोंडाला मास्क लावून क्रेटा गाडीतून चार चोरटे आले. आधी एक जण आत शिरला, त्याने सीसीटीव्ही कॅमेर्यावर काळा स्प्रे मारला, त्यानंतर काही वेळाने बाहेरची परिस्थितीचा अंदाज घेऊन इतर तीन जणांनी आत प्रवेश केला.
त्यांनी गॅस कटर मशीनच्या साहाय्याने एटीएम फोडले. मशीनमध्ये 28 लाख 35 हजार 400 रुपये घेऊन पोबारा केला. फिंगर प्रिंट चेक करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासून ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत वाढत्या एटीएम चोरी प्रकरणे वाढत असून पोलिसांना परराज्यातील टोळीवर संशय आहे. कारण सातत्याने एटीएम चोरीच्या घटना घडत असून अतिशय शिस्तबद्धरित्या चोरट्यांकडून एटीएम चोरी केली जात आहे. ही टोळी सीसीटीव्ही कॅमेर्यांवर रंग फासून चोर्या करत असल्याने टोळीपर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड जात आहे. जिल्ह्यात एटीएम मशीन चोरी प्रकरणांत वाढ झाली असून काही दिवसांपूर्वीच एकलहरेतील एका बँकेचे एटीएम मशीनच चोरुन नेण्यात आले होते. ग्रामीण भागातही अशाप्रकारच्या घटनांत वाढ झाली आहे.