हिंदू तरुणीने नकार देऊनही मुस्लीम तरुणाचे विवाहासाठी ब्लॅकमेलिंग

तक्रारीकडे पोलिसांची डोळेझाक; भाजपने केला भांडाफोड

उच्चशिक्षित हिंदू तरुणीने लग्न करावे, यासाठी अविवाहित मुस्लीम तरुणाने तिची छेडछाड करतानाच मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने मदतीसाठी शहर पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनीही डोळेझाक केल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात आला. संबंधित तरुणीच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत भाजपने रविवारी (दि.२) सातपूर पोलिसांशी चर्चा करत तरुणीला न्याय देण्याची मागणी केली. तसेच, तिच्या केसालाही धक्का लागला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे म्हणाले की, शनिवारी रात्री ११ वाजेदरम्यान कॉल आला. एका अविवाहित तरुणीला मुस्लीम तरुण विवाहासाठी त्रास देत असल्याचे सांगण्यात आले. संबंधित तरुणीची त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा नाही. तरीही, तो मुस्लीम तरुण तिला ब्लॅकमेल करतो आहे. तुझ्या घरासमोर आत्महत्या करण्याची धमकी तो देतो आहे. त्याने मुलीला मारहाणसुद्धा केली आहे. तिची भेट घेतली असता तिनेही त्याच्याशी लग्न करायचे नाही, असे सांगितले. त्यानंतर नाशिक शहर पोलिसांशी संपर्क साधत संबंधित मुस्लिम तरुणावर कारवाई करावी, अशी तरुणीने मागणी केली. तरीही, पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत होते. सरकारवाडा पोलीस ठाणेहद्दीत पीडित तरुणीची त्या तरुणाने तीन वेळा छेड काढली. त्याबाबत तरुणीने सरकारवाडा पोलिसांत तक्रार देऊनही पोलिसांनी लक्ष दिलेले नाही. दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणाला अटक न केल्यास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा देताच पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. अ‍ॅट्रोसिटीसह कोणते गुन्हे दाखल केले, याची पोलीस ठाण्यात येऊन माहिती घेतली जाईल. समाधान झाले नाहीतर आंदोलन केले जाईल, असे पालवे यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पीडित मुलीची आई व भाऊ उपस्थित होते.