मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार आणि खासदारांना अजित पवार यांच्या गटात प्रवेश सहभागी व्हावे म्हणून ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास देण्यात येत आहे. तू प्रतिज्ञापत्रावर सही कर नाहीतर अमुक-अमुक काम होणार नाही असे संबंधित आमदार खासदार यांना सांगितले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फेकून देणार असल्याची टीकाही पवार यांनी केली. (Blackmailing MLAs by Ajit Pawar group Allegation of Rohit Pawar)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्ताखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपाच्या सोबत गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली असून दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला आहे. याशिवाय शरद पवार गटाचे आमदार आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार गटाचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या उंचीवरून आरोप-प्रत्यारोप; रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात…
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि शिवसेना, राष्ट्रवादीतील काही नेत्यांना भाजपाने फक्त लोकसभा निवडणुकीसाठी जवळ केले आहे. भाजपा फक्त लोकसभेचा विचार करत आहे. मात्र, सध्याची स्थिती पहिली तर वातावरण भाजपाच्या विरोधात आहे. भाजपाबरोबर गेलेल्या लोकांना कुठेही लोकमत आणि जनमत राहिलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बाजूला करेल, असा दावा रोहित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार आणि एक आमदार अजित पवार गटात जाणार आहे किंवा नाही ते बघावे लागेल. यासाठी त्यांना ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत. तू सही कर नाहीतर काम होणार नाही असे सांगितले जात असल्याची माहिती आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधानांनी फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटलेल्या पक्षाने एनडीएसोबत केली युती
शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी करत अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. याकडे लक्ष वेधले असता रोहित पवार म्हणाले, काल विधानसभा अध्यक्ष दिल्लीला कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेले होते. तिथूनच त्यांनी अजित पवार गटाला फोन केला असेल आणि त्यानंतर त्यांची यावर चर्चा झाली असेल. त्यांची ती रणनिती असेल हा लढा न्यायालयात जाईल आणि विजय आमचा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.