रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत स्फोटामुळे कंपनीला भीषण आग, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

blast and fire broke out in Ratnagiri Lote MIDC chemical company

रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेल्या लोटे एमआयडीसीत केमिकलमुळे मोठा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. एमआयडीसीतील केमिकल कंपनीत मोठ-मोठे स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवारण पसरलं आहे. जखमींना परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या लोटे एमआयडीमध्ये प्रिवी ऑर्गेनिक्स लि. कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. एकाच कंपनीमध्ये तब्बल ६ ते ७ वेळा स्फोट झाला असल्यामुळे परिसर हादरला होता. रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास स्फोट झाला असून आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्ठळी धाव घेतली होती. आग इतकी भीषण होती की कंपनीपासून दहा किलोमीटरच्या अंतरावरुन धुराचे लोट दिसत होते. आगीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कंपनीत लागलेल्या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीमध्ये ज्या भागात केमिकलचे ड्रम ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला आहे. आगीमुळे स्फोट झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या कंपनीच्या बाजूलाच सीएनजी गॅस कंपनी असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवारण पसरले होते.

केमिकल कंपनीला लागलेली आग भीषण होती. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर ४ तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. परंतु अद्यापही धुराचे लोट असल्यामुळे आग पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीत कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.


हेही वाचा : अनिल देशमुखांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी