घरमहाराष्ट्रराज्यात रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिनाभरात ३० हजार युनिट रक्त संकलन

राज्यात रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिनाभरात ३० हजार युनिट रक्त संकलन

Subscribe

भविष्यात निर्माण होणारी रक्ताची टंचाई लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून ‘प्रथम रक्तदान मग लसीकरण’ करण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना करण्यात आले होते.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता महिनाभरापूर्वी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून वर्तवण्यात आली होती. राज्यातील विविध रक्तपेढ्यांकडे अवघे २० हजार रक्तसाठा उपलब्ध असल्याने सरकारकडून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघ्या एका महिन्यात ३० हजार युनिट रक्त संकलन केल्याने राज्यातील रक्तसाठा ५० हजारांवर पोहोचला आहे.

लस घेतलेली व्यक्ती साधारणपणे दोन महिने रक्तदान करू शकत नाही. त्यातच राज्यात आलेली कोरोनाची लाट आणि मार्चमध्ये रक्तसाठा २० हजार युनिटवर आल्याने काही दिवसांतच राज्यात रक्तटंचाई जाणवण्याची शक्यता राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून वर्तवण्यात आली होती. भविष्यात निर्माण होणारी रक्ताची टंचाई लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून ‘प्रथम रक्तदान मग लसीकरण’ करण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना करण्यात आले होते.

- Advertisement -

या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक महिन्यामध्ये तब्बल ३० हजार युनिट रक्तसंकलन केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या रक्तदानामुळे दैनंदिन रक्ताची गरज भागून सध्या राज्यामध्ये तब्बल ५० हजार युनिट रक्त साठा उपलब्ध झाला आहे. हा रक्तसाठा जवळपास महिनाभर पुरण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली.

सध्या उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्यामुळे रक्त टंचाईचे संकट ओसरले असले तरी राज्याला प्रत्येक महिन्याला एक ते दीड लाख युनिट रक्ताची गरज लागते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील दोन महिने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे रक्तपेढ्यांच्या गरजेनुसार पुढील काही दिवसांत सामाजिक संस्था, सोसायट्या यांनी टप्प्याटप्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही थोरात यांनी सांगितले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्यास उपलब्ध होणारे रक्त हे किमान ३५ दिवसच वापरता येते. त्यानंतर ते खराब होते. संकलित केलेल्या रक्ताचा पुरेपुर वापर व्हावा यासाठी रक्तपेढ्यांच्या गरजेनुसार रक्तदान शिबिर भरवण्यावर संस्थाही भर द्यावा, असेही थोरात यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -