दुर्गम भागातील लोकांच्या स्वास्थ्यासाठी ‘ब्लॉसम’

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचे उद्घाटन

नाशिक : आदिवासी भागातील लोकांसाठी उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी ‘ब्लॉसम’ हा उपक्रम प्रभावी ठरेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली शासनाचा आदिवासी विकास विभाग व कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ’ब्लॉसम’ प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, आदिवासी विकास विभागाचे अतिरीक्त आयुक्त रविंद्र ठाकरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थानचे अध्यक्ष अरुण ललवाणी, विश्वस्त सुधीर दिवे, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा नागपूर विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी, प्रकल्प समन्वयक डॉ. अजीत सावजी उपस्थित होते.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधनासमवेत विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्माण होईल, असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. सामाजिक विकासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगार महत्वपूर्ण असून त्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करुन सेवा दिली पाहिजे. दूर्गम भागात कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्यावर आधारीत उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठांनी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु करावेत. ‘ब्लॉसम’ या उपक्रमाच्या माध्यमातून दूर्गम भागातील लोकांना स्वास्थ्य विषयक लाभ होणार आहे. आधुनिक आरोग्य विद्याशाखांबरोबरच योगा, प्राणायम यांचा देखील समावेश करण्यात यावा. सिकलसेल, थॅलेसिमिया, कुपोषण आदी आरोग्य विषयक प्रश्न दूर्गम भागात मोठ्या प्रमाणात आढळतात. या दृष्टीकोनातून देखील कार्य करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली.

विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर सांगितले की, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली यासारख्या दूर्गम भागात विद्यार्थी स्वयंसेवक आरोग्य विषयक जागृती करणार आहेत. आरोग्य सेवा देतांना होणार विलंब त्यातील अडचणी तसेच विविध आजाराची गंभिता लक्षात घेऊन प्रश्नावली व प्रत्यक्ष कार्य करण्यात येणार आहे. विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. स्थानिक डॉक्टर, तज्ज्ञ व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य ’ब्लॉसम’ उपक्रमासाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नीत तोरणे यांनी आभार मानले.