घरताज्या घडामोडीमुंबईतील प्रदूषणावर नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक, महापालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक, महापालिका आयुक्तांचे आवाहन

Subscribe

संपूर्ण जगात प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. त्याचे दुष्परिणाम नागरिकांना जाणवत आहेत. मात्र मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून सर्व भागधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सदिच्छादूत, सिने अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यासह एनजीओच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार यांची विशेष भेट घेतली. यावेळी, आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली, वातावरण फाऊंडेशनच्या श्रृती पांचाळ, रसिका नाचणकर, बीईएजी संस्थेच्या हेमा रमाणी, कार्टर क्लिनअप संस्थेच्या फ्रेशिया बी, एकसाथ फाऊंडेशनचे आश्विन माळवदे आदींसह पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांचे प्रतिनिधी, महापालिकेचे उपायुक्त (पर्यावरण)अतुल पाटील, एच/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, विशेष कार्य अधिकारी सुनील गोडसे, सुनील सरदार आदी मान्यवर देखील याप्रसंगी उपस्थित होते.

- Advertisement -

महापालिकेकडून दीर्घकालीन उपाययोजना : डॉ. संजीव कुमार

मुंबई महापालिका क्षेत्रात हवा प्रदूषण नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने यापूर्वीच तत्काळ प्रभावाच्या दृष्टीने अल्पकालीन व भविष्याची गरज लक्षात घेवून दीर्घकालीन अशा दोन्ही स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणाऱ्या धूळ नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली जात आहे. यासंबंधातील सर्व भागधारक घटकांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल. मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा / राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी ६०० मेट्रिक टन प्रतिदिन एवढ्या क्षमतेचे दोन बांधकाम व पाडकाम (कन्स्ट्रक्शन ॲण्ड डिमोलिशन वेस्ट) प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी पाच ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्रणा उभारली जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनामध्ये आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा उपयोग करुन हवा प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबई महानगराच्या विविध पाच भागात हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मिळून नागरी वनांच्या माध्यमातून आजवर चार लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम (एनकॅप) मध्ये मुंबई महापालिका सहभागी आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाद्वारे प्रदूषण नियंत्रणाचे धडे द्यावेत : दिया मिर्झा

प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका, आयआयटी, नीरी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, बांधकाम व्यावसायिकांची संघटना, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, वाहतूक नियंत्रण विभाग यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी देखील एकत्र यावे. महापालिका प्रशासनाने विभाग स्तरीय कार्यशाळा आयोजित कराव्यात.

जनजागृती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाद्वारे प्रदूषण नियंत्रणाची गरज, त्यासाठी हाती घ्यावयाचे उपक्रम याबाबत अवगत करावे, जेणेकरुन भावी पिढी सजग होवून लोकसहभाग वाढण्यास मदत होईल, असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सदिच्छादूत या नात्याने दिया मिर्झा यांनी यावेळी केले.


हेही वाचा : थू… तुमच्यावर ; देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर पातळीसोडून टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -