अमेरिकेत माझी कोणतीही मालमत्ता नाही, आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी फेटाळले आरोप

भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली होती. परंतु माझ्यावर झालेले आरोप निराधार असून मला वादाच्या भोवऱ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे.अमेरिकेत माझी कोणतीही मालमत्ता नाही, असं म्हणत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आरोप फेटाळले आहेत.

काय म्हणाले इक्बाल सिंग चहल?

मोहित कंबोज यांनी माझ्याबाबत केलेले आरोप निराधार आहेत. त्यांनी त्यांची राजकीय लढाई राजकीय स्तरावर लढावी. मात्र त्यामध्ये अधिकाऱ्यांना उगाचच ओढू नये, या शब्दांत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी भाजपचे नेते मोहित कंबोज यांना सुनावले असून उपरोधिक सल्लाही दिला आहे.

इक्बाल सिंग चहल यांनी अमेरिकेत मालमत्ता खरेदी केली असून त्याबाबतची माहिती येत्या आठवड्याभरात आयकर विभागाला देणार असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. तसेच, आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी आयकर विभागाकडे करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी, वरीलप्रमाणे खुलासा करीत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

राजकीय लढ्यात मला अडकवण्याचा प्रयत्न

माझी अमेरिकेत कोणतीही संपत्ती नाही. तसेच, मोहित कंबोज यांनी सत्य माहितीच्या आधारे भाष्य करावे, उगाचच खोडसाळ माहिती देऊ नये. हा मला वादात ओढण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या राजकीय लढ्यात ते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे खरोखरच दुःखद आणि दुर्दैवी आहे. कंबोज यांनी, त्यांची राजकीय लढाई ज्यांच्याशी आहे, त्यांच्याशी लढावे, या शब्दात सुनावले आहे. मात्र या राजकीय लढाईत अधिकाऱ्यांना उगाचच ओढू नये, असा सल्लाही आयुक्त चहल यांनी मोहित कंबोज यांना दिला आहे.

समीत ठक्कर यांनी ४ मार्च २०२२ रोजी केलेल्या ट्विटमध्ये आयकर विभाग माझी वैयक्तिक चौकशी करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा दुर्भावनापूर्ण, खोडसाळ आणि वस्तुस्थितीनुसार चुकीचा होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात त्वरित तक्रार दाखल करण्यात आली होती, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

मोहित कंबोज यांनी दाखवलेली आयकर विभागाची नोटीस ही यशवंत जाधव यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत २०१८ पासून पालिकेकडून माहिती मिळविण्याची एक नियमित सूचना होती. ही केवळ माहितीची आंतर-विभागीय देवाणघेवाण आहे. या सूचना येतात आणि योग्य स्तरावर उत्तरे दिली जातात. हे मी कालच सांगितले होते.

मला बदनाम करण्यासाठी तथ्ये फिरवण्याचा प्रयत्न

मोहित कंबोज मला बदनाम करण्यासाठी तथ्ये फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे. मी कंबोज यांना विनंती करतो की, त्यांनी आपली राजकीय लढाई राजकीय पातळीवर लढावी आणि अधिकार्‍यांना यात ओढू नये. सत्याचा नेहमी विजय होईल, असे चहल यांनी म्हटले आहे.

पालिकेतील शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर एक महिन्यांपूर्वी आयकर विभागाने धाड टाकून कारवाई केली होती. यशवंत जाधव यांच्या घरातून काही रोकड व कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माध्यमांना दिली होती.

यशवंत जाधव यांच्याशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी चौकशीबाबत आयकर विभागाने महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना ३ मार्च रोजी नोटीस बजावून काही कागदपत्रे सोबत घेऊन १० मार्च रोजी आयकर कार्यालयात उपस्थित राहण्याचे फर्मावले होते. मात्र आयुक्त काही कामानिमित्त दिल्लीला गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. आता या घडामोडीनंतर मोहित कंबोज यांनी, आयुक्त चहल यांची अमेरिकेत बेकायदा संपत्ती असल्याचा दावा करीत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता यशवंत जाधव प्रकरणात आयुक्त यांना घेरण्याचा कंबोज यांचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा : यशवंत जाधव गैरव्यवहार प्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा, मोहित कंबोज यांची मागणी