BMC Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची भेट

मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीत वेगवेगळे सूर लागलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर (BMC Election) लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

राज्यात होऊ घातलेल्या मुंबईसह विविध महानगरपालिकेच्या निवडणुकांबरोबरच, पुढील वर्षी 2024मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता, महाविकास आघाडीने एप्रिल ते जून या कालावधीत राज्यभरात संयुक्तपणे सात ‘वज्रमूठ’ सभा (Vajramuth rally) घेण्याचे नियोजन केले होते. मात्र त्या आता होतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे.

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल, बुधवारी वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक झाली. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.

या बैठकीत मुंबई शहरातील मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेताना शहरातील नालेसफाई, विविध विकासकामांची सद्यस्थिती, वाहतूक कोंडीची समस्या, रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण कामांची सद्यस्थिती, नगरसेवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. तसेच माजी नगरसेवकांकडून हे प्रश्न समजून घेऊन त्यातील काही प्रश्नांचे तातडीने निराकरणही केले. निर्देश दिल्याप्रमाणे ही कामे करून घ्यावीत तसेच त्यांची प्रगती माझ्यापर्यंत पोहचवावी, असे या सर्व माजी नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, उपनेते-विभागप्रमुख यशवंत जाधव, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.