Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र BMC election : ठाकरे गट 50चा आकडाही पार करू शकणार नाही; आशिष...

BMC election : ठाकरे गट 50चा आकडाही पार करू शकणार नाही; आशिष शेलार यांचा दावा

Subscribe

मुंबई : गेल्या 25 वर्षांत मुंबईकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला (Shiv Sena UBT) प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या टिकवून होता, कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धव ठाकरेंची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (BMC election) 50चा आकडाही पार करू शकणार नाही, असा दावा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी केली.

मुंबई भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक तसेच आमदार अमित साटम, योगेश सागर, सुनील राणे, पराग अळवणी, कालिदास कोळंबकर, मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, विद्या ठाकूर, राजहंस सिंह, कॅप्टन तमिळ सेल्वन यांच्यासह महामंत्री संजय उपाध्याय, जयप्रकाश ठाकूर, चित्रा वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, सुनील कर्जतकर, केशव उपाध्ये, गटनेते प्रभाकर शिंदे, राज पुरोहित, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखते. हे दुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. तरीही टीका करणाऱ्यांचे स्वागत आहे. प्रत्येक टीकेतून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही बंद खोलीतून स्वतःच्या मनाशी स्वतः बोलणारे नाहीत. आम्ही खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्व आहोत आणि म्हणून कर्नाटकचे निकाल लागले त्यानंतर ज्यांची बोलती इतके दिवस बंद होती ते लगेच बोलू लागले, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

कर्नाटकात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, हे खरे आहे. आम्ही मतदाराने दिलेल्या कौलाचा संपूर्ण विनम्रतेने स्वीकार करून त्याचे विश्लेषण करू. निकालाच्या विश्लेषणाचे काम राष्ट्रीय स्तरावर होईल. पोपटपंची करणारे पोपट बोलायला लागल्यावर मी, मुद्दाम आकडेवारीची माहिती घेतली. त्याठिकाणी एक हजाराच्या खाली जागा गेल्या अशा पाच जागा आहेत. तीन जागा अशा आहेत, ज्या दोन हजार मतांनी गेल्या, बावीस जागा अशा आहेत ज्या पाच हजाराच्या फरकाने गेल्या आहेत. सहा-सात हजाराच्या अंतराने गेल्या अशा सोळा जागा आहेत, या सगळ्याची गोळा बेरीज केली तर 47 होते. या 45 जागा मिळाल्या असत्या तर 85 वर काँग्रेस आणि 110वर भाजपा गेली असती. पण आम्हाला पराभव मान्य आहे. त्याचे विश्लेषण करू, असे ते म्हणाले.

…म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी नाकारले
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 1997 साली 103 नगरसेवक होते. 1997 ते 2002 या काळात हा आकडा 97वर आला त्यानंतर ते 84वर आले. 2012मध्ये तर ही संख्या 75वर आली. 2017मध्ये 84 जागा मिळाल्या. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा 60वर आला असता, असा दावाही त्यांनी केला.

मुंबईकरांनी यांना नाकारले, झिडकारले. मुंबईकरांनी कधीच त्यांना आपले म्हणायचे देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पाकीटमारीत मोठे नाव आहे… पाकीटमारीचा धंदा करणारे महापालिकेतील तसेच मविआच्या अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही आशिष शेलार म्हणाले.

- Advertisment -