घरमहाराष्ट्रमराठी भाषेत पदवी प्राप्त पालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळणार

मराठी भाषेत पदवी प्राप्त पालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळणार

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय; शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश

मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने परिपत्रक काढले असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा त्याचप्रमाणे महापालिकेचे व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावेत आणि मराठी भाषेचा अभ्यास करण्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी भाषेत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केलेला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी २०१५ पासून पुढे बंद होती. त्यामुळे त्यानंतर पदवी मिळवणारे पालिका कर्मचारी या वेतनवाढीपासून वंचित होते.

- Advertisement -

त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी २०१६ ते २०१८ पर्यंत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मिळावी अशी आग्रही मागणी सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी याबाबत निर्देशित केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेऊन तातडीने बैठक बोलावत या प्रश्नचा आढावा घेऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला. त्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेतील जवळपास १ हजार ४८९ पालिका कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर ५२ लाख ६३ हजार रुपयांचा भार पडणार आहे.

या निर्णयामुळे मराठी भाषेत पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता कर्मचाऱ्यांनी आपला वेळ आणि पैसा खर्च केला असून, काम आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आहे त्यामुळे माय मराठीसाठी महापालिकेचा ठराव क्रमांक ११६५ ची अंमलबजावणी करण्यात यायलाच हवी अशी भूमिका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.

- Advertisement -

या विषयावर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतल्यानंतर या विषयाची तपासणी करून आठ दिवसात महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. पुढील तीन महिन्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी आमदार प्रभू यांना आशवस्त केले होते. आज याबाबतचे परिपत्रक काढून शिवसेना मराठी भाषेच्या जतन संवर्धन आणि वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -