गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, पालिकेने घर बेकायदेशीर ठरवून बजावली नोटीस

Adv-Gunratna-Sadavarte
संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आक्रमक एसटी कर्मचार्यांनी धडक दिली होती. घरावर दगडफेक आणि चप्पलफेक कर्मचाऱ्यांनी केली होती. या हिंसक हल्ल्यात अडकलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते हे लवकरच बेघर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सदावर्ते हे राहत असलेल्या परळ येथील ‘क्रिस्टल टॉवर’ मधील १६ व्या मजल्यावरील घर हेल्थ सेंटरच्या जागेत बांधल्याचा ठपका पालिका यंत्रणेने ठेवला आहे. तसेच, ‘ओसी’ नसल्याने सदर इमारतीला नोटीस बजावली असून जोपर्यत ऍड.सदावर्ते यांचे घर हटविण्यात येत नाही तोपर्यंत सदर इमारतीला ‘ ओसी’ न देण्याची ताठर भूमिका पालिकेने घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप असताना गोत्यात आलेले सदावर्ते यांच्या घरावर पालिकेच्या कारवाईची टांगती तलावर लटकत आहे. आता ऍड. सदावर्ते यांना स्वतःला वाचविण्याची धडपड करताना आपले राहते घरसुद्धा वाचविण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. एकूणच ऍड. सदावर्ते यांच्या अडचणीत एकामागोमाग एक अडचणी वाढत जात आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला कायदेशीर मार्गाने न्यायालयात हाताळणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते हे त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबाबत दिलेल्या चिथावणीमुळे आणि त्यामुळे पवार यांच्या ‘ सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आंदोलक कर्मचार्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच आता पालिकेने त्यांच्या परळ येथील ‘क्रिस्टल टॉवर’ मधील घराबाबत चौकशी करून ते बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. सदर घर हेल्थ सेंटरच्या जागेत बांधल्याचा दावा पालिकेने केला आहे. जोपर्यत ऍड.सदावर्ते यांचे घर हटविण्यात येत नाही तोपर्यंत सदर इमारतीला ‘ ओसी’ न देण्याची ताठर भूमिका पालिकेने घेतली आहे. पालिकेने क्रिस्टल टॉवर इमारतीला ओसी नसल्याने नोटीस बजावली आहे. सदर इमारतीच्या मूळ आराखड्यात आयत्यावेळी बदल करून तो आराखडा इमारत प्रस्तावाकडे मंजुरीसाठी पाठवल्याने इमारत प्रस्ताव विभागाने इमारतीला ओसी नाकारली होती. मात्र तरीही पालिका दुप्पट दराने या इमारतीला पाणीपुरवठा करते. बेस्टकडून वीज पुरवठा केला जात आहे.

दरम्यान, ऍड.सदावर्ते यांच्या घरासह सर्व रहिवाशांना अनधिकृत रहिवासी घोषित केले असून नियमाप्रमाणे इमारत प्रस्ताव विभागाकडून सर्वांना ३५३ (ए) अन्वये दोनदा नोटीस पाठवण्यात आली आहे. सदर इमारतीला ओसी हवी पाहिजे असेल तर बिल्डर आणि आर्किटेक्टने इमारतीमधील अनधिकृत बांधकामे तोडून टाकावीत. तसेच, इमारतीचा सुधारित आराखडा इमारत प्रस्ताव विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला तर इमारतीला ओसी मिळेल आणि रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने दिली आहे.


हेही वाचा : अयोध्या दौऱ्यात यूपीतील मशिदींवरील भोंगे बंद आहेत का तपासावेत, जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला