मुंबई : काही ठराविक बड्या मालमत्ताधारकांना महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. आर्थिक क्षमता असताना देखील काही बड्या मालमत्ताधारकांनी कर न भरल्याचे समोर आले आहे. तसेच काही मालमत्ताधारक हे मुदतीमध्ये मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करतात, त्यांना आता महापालिकेने इशारा दिला आहे. जर कर थकबाकी वेळेत भरला नाही तर संबंधित मालमत्ताधारकाची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. 10 बड्या मालमत्ताधारकांकडे 600 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. त्यामुळे आता जे मालमत्ताधारक कर थकबाकी वेळेत भरणार नाही, त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. (Mumbai Municipal corporation issues seizure notice to property tax defaulters.)
हेही वाचा : Maharastra Politics : आमच्याकडे संख्याबळ असेल तर…, प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका
जर या बड्या मालमत्ताधारकांकडून योग्य वेळेत कर भरला नाही तर महापालिकेच्या अधिनियमानुसार सुरुवातीला मालमत्तेतील वस्तू जप्त करुन लिलाव केला जाईल आणि जप्त वस्तूंमधूनही कर वसूल झाला नाही तर, मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट सांगितले आहे. कारण मुळात मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे मालमत्ता कराचे वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न कर निर्धारण व संकलन विभागाकडून केले जात असल्याचे दिसून येते. तसेच पालिकेकडून विविध माध्यमांतून जनजागृती देखील केली जाते.
महापालिकेकडून अनेक प्रकारच्या उपाययोजना आणल्या जातात. कारण मालमत्ता कर हा त्यांचा एकमेव आणि मुख्य स्त्रोत आहे. तसेच मालमत्ता कर भरताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. याबाबतची माहिती पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरीही वारंवार सूचना देऊनही काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अजूनही मालमत्ता कर न भरल्याने आणि योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा देखील यामध्ये समावेश असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. नियमानुसार यानंतर लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीस मिळालेल्या मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
हेही वाचा : Politics : भाजपाने घेतलेली उडी म्हणजे…, अदानी प्रकरणी ठाकरे गटाचा थेट हल्लाबोल
20 नोव्हेंबरपर्यंतच्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी
- दि रघुवंशी मिल्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – ११९ कोटी ५८ लाख ९८ हजार ६०० रुपये
- मेसर्स ओंकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) – १०४ कोटी ७८ लाख २५ हजार ७१३ रुपये
- जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एच पूर्व विभाग) – ७१ कोटी ९८ लाख ०३ हजार ४४५ रूपये
- जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एच पूर्व विभाग) – ६७ कोटी ५२ लाख १० हजार ५०२ रूपये
- मेसर्स स्टर्लिंग इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि.(जी दक्षिण विभाग) – ५५ कोटी १० लाख ५६ हजार ९५६ रुपये
- मेसर्स विमल असोसिएट्स (के पूर्व विभाग) – ४१ कोटी ७४ लाख ११ हजार २१५ रुपये
- दि रघुवंशी मिल्स् लि. (जी दक्षिण विभाग) – ३८ कोटी ४८ लाख ६७ हजार ७९५ रुपये
- प्रोव्हिनंस लॅण्ड प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) – ३३ कोटी ६९ लाख ०७ हजार ७९ रुपये
- समीर एन. भोजवानी (के पश्चिम विभाग) – ३३ कोटी ३९ लाख ४५ हजार ४० रूपये
- मेसर्स श्रीराम मिल्स् लि. (जी दक्षिण विभाग) – ३३ कोटी २३ लाख ५४ हजार ९६५ रूपये
21 नोव्हेंबरपर्यंतच्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी
- मेसर्स एच. डी. आय. एल. लिमिटेड (एच पूर्व विभाग) – ३१ कोटी ६८ लाख ५१ हजार ३९८ रुपये
- कमला मिल्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – ३० कोटी ८२ लाख ६२ हजार १६६ रूपये
- मेसर्स वाधवा डिझर्व्हह बिल्डर (एम पूर्व विभाग) – २६ कोटी २४ लाख २९ हजार ६६५ रूपये
- कमला मिल्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – २३ कोटी ६४ लाख १९ हजार ८३४ रुपये
- गोविंदराम ब्रदर्स लिमिटेड (के पश्चिम विभाग) – २२ कोटी ३० लाख ६७ हजार ०५० रुपये
- हीज होलीनेस सरदार ताहीर सैफुद्दिन साहिब (डी विभाग) – १९ कोटी ९० लाख २४४ रुपये
- गॅलेक्सी कॉर्पोरेशन (एच पश्चिम विभाग) – १८ कोटी ६६ लाख ८१ हजार ४९४ रुपये
- सुरज हांडा, विष्णू प्रसाद (के पश्चिम विभाग) – १८ कोटी १२ लाख १८ हजार ९१३ रुपये
- अरिस्टों डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एम पूर्व विभाग) – १६ कोटी ०५ लाख ९३ हजार ४१९ रुपये
- ओंकार डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – १४ कोटी ८७ लाख ५९ हजार ५८२ रूपये
Edited By Komal Pawar Govalkar