घरमहाराष्ट्रऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याची पालिका दरबारी 'लटकंती', ठाकरे गट गॅसवर

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याची पालिका दरबारी ‘लटकंती’, ठाकरे गट गॅसवर

Subscribe

ऋतुजा लटके यांनी त्यांच्या कामाचा रीतसर व सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून राजीनामा दिलेला आहे. त्यांनी, प्रथम २ सप्टेंबर रोजी राजीनामा सादर केला होता.

मुंबई – अंधेरी विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या घोषित उमेदवार व पालिकेच्या के/ पूर्व विभाग उपायुक्त कार्यलयात कार्यकारी सहाय्यक लिपिक पदावर कार्यरत ऋतुजा लटके यांचा नोकरीचा पहिला राजीनामा फेटाळल्यानंतर आता दुसरा राजीनामा प्रशासनाने नियमांवर बोट ठेवत अद्याप मंजूर न केल्याने या अर्जांची पालिका दरबारी ‘लटकंती’ सुरूच आहे.

हेही वाचा – अंधेरी पोटनिवडणूक मशाल चिन्हावरच लढणार, आमची निष्ठा बाळासाहेबांसोबतचं; ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी त्यांचा पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करण्यासाठी मंगळवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी उप महापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह पालिका आयुक्त इकबाल चहल यांची पालिका मुख्यालयातील कार्यालयात भेट घेतली. यावेळी, माजी नगरसेवक व सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, चंद्रशेखर वायंगणकर हे उपस्थित होते.

ऋतुजा लटके यांनी त्यांच्या कामाचा रीतसर व सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून राजीनामा दिलेला आहे. त्यांनी, प्रथम २ सप्टेंबर रोजी राजीनामा सादर केला होता. मात्र तो मंजूर न करता २९ सप्टेंबर रोजी फेटाळण्यात आला. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा त्यांचा राजीनामा सादर केला. मात्र आमच्या नेत्यांनी त्यांच्याकडे वारंवार विचारणा करूनही त्यांनी तो राजीनामा अद्यापही मंजूर केला नाही. वास्तविक, पालिका आयुक्त इकबाल चहल हे आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून लटके यांचा राजीनामा मंजूर करू शकत होते; परंतु आयुक्तांवर ‘शिंदे’ गटाचा राजकीय दबाव असल्याने त्यांनी अद्यापही लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही, असा गंभीर आरोप माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसैनिकांचा मशाली पेटवत जल्लोष

पालिकेचा निषेध; न्यायालयात धाव

युक्तांवर कोण दबाव टाकत आहे ते महाराष्ट्रातील जनतेला चांगले माहीत आहे. ही बाब लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक लटके यांचा राजीनामा मंजूर करीत नाही. त्यामुळे या तांत्रिक अडचणीबाबत आम्ही कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन न्यायालयात दाद मागणार आहोत, असे महाडेश्वर यांनी सांगितले. १४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असून तोपर्यंत निर्णय व्हावा व आम्हाला न्याय मिळावा, यासाठी आता आम्ही पालिका प्रशासनाच्या अडेलट्टूपणा विरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी धाव घेतली आहे. उद्या याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र पालिकेच्या मुजोरगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी माहिती माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

शिवसेनेकडे पर्याय तयार

आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल अशी आशा आहे. आमच्या बाजूने निकाल लागल्यावर ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल. अगदीच काही अडचण आल्यास शिवसेनेकडे दुसरा पर्याय तयार आहे, असे विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

हेही वाचा – ऋतुजा लटकेंचा महापालिकेचा राजीनामा जाणूनबुजून मंजूर केला जात नाही; परबांचा शिंदे गटावर आरोप

मशाल चिन्हावरच निवडणूक लढविणार – ऋतुजा लटके

माझे पती रमेश लटके हे शिवसेनेशी एकनिष्ठ होते. आमचा परिवारही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. मी जर निवडणूक लढवली तर ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात व मशाल या चिन्हावरच लढवणार आहे, असा दावा उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी यावेळी केला.

माझ्यावर सरकारचा कोणताही दबाव नाही – इकबाल चहल, आयुक्त , मुंबई महापालिका

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. मात्र पालिका नियम असे सांगतो की, एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या नोकरीचा राजीनामा सादर केला तर ३० दिवसांत त्याबाबत निर्णय घेता येतो. ऋतुजा लटके यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा हा ३ऑक्टोबर रोजी सादर केला आहे. मात्र माझ्यावर राज्य सरकारचा कोणताही दबाव नाही.

हेही वाचा – मोठी बातमी! ऋतुजा लटके शिंदे गटाच्या बाजूने लढणार?

ऋतुजा लटकेंबाबत ‘अशी ही बनवाबनवी’ – भाजप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऋतुजा लटके यांना खरेच उमेदवारी द्यायची आहे का ? की ते ऋतुजा लटके यांच्याबाबत ‘बनवाबनवी’करून आणि त्यांचा राजीनामा पालिका नियमांच्या फेऱ्यात मुद्दाम अडकवून उगाचच भाजप आणि पालिका प्रशासनावर खापर फोडत आहेत, असा सवाल उपस्थित करीत भाजपचे माजी नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर चांगलीच आगपाखड करीत तोफ डागली.

उद्धव ठाकरे गटाकडे माजी विधी व कायदे मंत्री असून ते या विषयावर पत्रकार परिषदा घेऊन उगाचच राज्य सरकार व भाजप यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यांना ऋतुजा लटके यांचा राजीनामा अर्ज कसा व कधी सादर करावा, तो राजीनामा मंजूर होण्यासाठी पालिकेचे के नियम व अटी शर्ती आहेत, याची माहिती नाही का ? अशा शब्दात प्रभाकर शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाची कानउघाडणी केली.

मुळात ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायची नसेल व दुसऱ्या पर्यायाला संधी द्यायची असल्यानेच त्यांच्या राजीनाम्याबाबत जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्यात आलेला आहे, असा गंभीर आरोपही प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -