राणा दाम्पत्याला ७ दिवसात घरातील नियमबाह्य बांधकाम हटविण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश

Rana couple responded to the court's notice
Rana couple responded to the court's notice

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेशी पंगा घेणारे खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना त्यांच्या फ्लॅटमधील नियमबाह्य बांधकामांबाबत पालिकेने पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राणा यांच्या खार येथील इमारतीतील फ्लॅटमध्ये करण्यात आलेले नियमबाह्य बांधकाम येत्या ७ दिवसात स्वतःहुन हटवावे. अन्यथा मुंबई महापालिका त्याची गंभीर दखल घेऊन सदर फ्लॅटमधील नियमबाह्य बांधकामांवर कारवाईसाठी हातोडा उगारेल, असा इशारा सदर नोटीशीमध्ये देण्यात आला आहे.

राणा दाम्पत्यांच्या खार येथील इमारतीमधील फ्लॅटमध्ये मंजूर आराखड्यात तब्बल १० ठिकाणी नियमबाह्यपणे बदल करून त्या ठिकाणी नियमबाह्य बांधकामे केल्याचा ठपका ठेवण्यात पालिकेने ठेवला आहे. सदर फ्लॅटसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, काम न करता नियमबाह्य काम करण्यात आल्याचे पालिकेच्या पथकाला आढळून आले आहे. त्यामुळेच पालिकेच्या एच पश्चिम विभागाने सदर नियमबाह्य बांधकामाची गंभीर दखल घेऊन राणा दाम्पत्याला कलम ३५२, ३५३ अन्वये नोटीस बजावली आहे.

ही नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसांत फ्लॅटमधील नियमबाह्य बांधकाम हटवले नाही, तर पालिका स्वतः राणा यांच्च घरी जाऊन सदर नियमबाह्य कामांवर कारवाई करणार आहे. याबाबतची माहिती एच/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

१० ठिकाणी नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप

(१) लिफ्टजवळची मोकळी जागा फ्लॅटमध्ये घेऊन तिथे टॉयलेट बांधले.

(२) किचनमध्येच पूजा रूम सामावून घेतला आणि बाकी मोकळ्या जागेचा वापर हॉलसाठी केला.

(३) लॉबीचा वापर घरगुती वापरासाठी केला.

(४) उताराची जागा सपाट करून ती जागा बेडरूमला जोडण्यात आली.

(५) मोकळ्या उताराच्या जागेचे रूपांतर बाल्कनीत केले.

(६) हॉलचे दोन भाग करून एक हॉलशी आणि दुसरा बेडरूमशी जोडला.

(७) बाल्कनीचा भाग बेडरूम आणि किचनला जोडला.

(८) टाॅयलेट व मोकळी जागा बेडरुमला जोडली.

(९) बेडरुम व हॉलशी संबंधित उंच जागा एकमेकांशी जोडली.

(१०) दोन बेडरुम आतून एकमेकांशी जोडले.


हेही वाचा : लोकांनी इतके रंग बदलल्याचे पाहून सरड्यालाही लाज वाटेल, अरविंद सावंतांची राज ठाकरेंवर टीका